ठळक मुद्देभारतीय संघाचा आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकारसलग सात ट्वेंटी-20 सामन्यांत विजय मिळवत स्वतःचा विक्रम मोडला
गयाना : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचला. अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिलांनी तीन वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला. स्मृती मानधनाने (८३) कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारत विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह कर्णधार हरमनप्रीत कौरने पुरूष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली.
भारतीय महिला संघाने साखळी गटातील चारही सामने जिंकले आणि B गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने २०१४ आणि २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत साखळी गटातील सर्व सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. तोच पराक्रम आज हरमनप्रीतच्या महिला संघाने केला. विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्व सामने जिंकणारा हा तिसरा भारतीय संघ ठरला. यापूर्वी पुरुष संघाने साखळी गटात २०१४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत चार आणि २०१५ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत सहा सामने जिंकले होते.
"विजयाचे श्रेय सर्व मुलींना, या सर्वांचे योगदान फार महत्त्वाचे होते. आमच्या आजच्या क्षेत्ररक्षणाने प्रशिक्षक आनंदित झाले असतील. संघाचा अभिमान वाटतो. स्मृतीने अप्रतिम खेळ केला," अशी प्रतिक्रिया हरमनप्रीतने दिली.