Join us  

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वन डेत दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला; भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा बोलबाला दिसतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 6:47 PM

Open in App

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा बोलबाला दिसतोय... दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर आज त्यांनी अमेरिकेविरुद्ध ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ गोंधळला अन् त्यांनी पटापट विकेट टाकल्या. झिम्बाब्वेने वन डे क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला. 

जॉयलॉर्ड गुम्बी आणि इनोसेंट काइया ( ३२) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. जॉयलॉर्ड व कर्णधार सीन विलियम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना अमेरिकेच्या गोलंदाजांना बेक्कार कुटले. जॉयलॉर्ड ७८ धावांवर माघारी परतल्यानंतर विलियम्स आणि फॉर्मात असलेल्या सिकंदर रझाची बॅट तळपली. रझाने २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा कुटल्या. रायन बर्लने १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांची आतषबाजी केली. सीन द्विशतक झळकावेल असे वाटत होते, परंतु तो १०१ चेंडूंत २१ चौकार व ५ षटकारांसह १७४ धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेने ६ बाद ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यांनी भारताचा २०१४ सालचा  ( ५/४०४ वि. श्रीलंका) विक्रम मोडला. 

 स्टीव्हन टेलर आणि सुशांत मोदानी या दोन्ही सलामीवीरांना रिचर्ड एनगारावाने माघारी पाठवले. त्यानंतर ब्रड इव्हान्स व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी १ धक्के दिले. त्यात दोन फलंदाज रन आऊट झाल्याने अमेरिकेची अवस्था ६ बाद ४५ अशी झाली होती. अभिषेक पराडकर ( २४) आणि जेस्सी सिंग ( २१) यांनी काही काळ संघर्ष केला. अमेरिकेचा संघ १०४ धावांत तंबूत पाठवून झिम्बाब्वेने ३०४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने २०२३ च्या सुरुवातीला श्रीलंकेवर ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता आणि वन डे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला होता. न्यूझीलंडने २००८मध्ये आयर्लंडवर २०९ धावांनी विजय मिळवला होता आणि आज तो विक्रम झिम्बाब्वेने तोडला . 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपझिम्बाब्वेअमेरिका
Open in App