Join us  

ICC World Cup 2019 : विश्वचषक अंतिम सामन्यात कुणाचे आहे पारडे जड, एकदा वाचाच...

१९९२ आणि २०१९ या दोनच विश्वचषक स्पर्धा अशा आहेत ज्यात जो कुणी संघ विश्वविजेता ठरेल त्याने दोन पेक्षा अधिक सामने गमावलेले असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 9:15 PM

Open in App

-ललित झांबरे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून कधीच बाद झाला असला तरी त्यांचा १९९२ मधील विश्वविजय आणि यंदाची स्पर्धा याची तुलना काही थांबत नाही. आता ताजी तुलना पहा : १९९२ आणि २०१९ या दोनच विश्वचषक स्पर्धा अशा आहेत ज्यात जो कुणी संघ विश्वविजेता ठरेल त्याने दोन पेक्षा अधिक सामने गमावलेले असतील. १९९२ मध्ये पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज, भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झालेला होता तर यावेळी इंग्लंडचा संघ पाकिस्तान, श्रीलंका आणि आॅस्ट्रेलियाकडून तर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत झालेला आहे. 

इंग्लंड आणि न्यूझीलंडचा हा सामना म्हणजे आक्रमक फलंदाजीचा संघ विरूद्ध गोलंदाजीतील माहीर संघ असा असू शकतो कारण या स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंडची धावगती ६.४३ अशी सर्वोच्च आहे तर प्रती विकेट ४३.२६ धावा हे त्यांचे प्रमाणसुध्दा दुसरे सर्वाधिक आहे. याच्याउलट न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा  इकॉनॉमी रेट हा ५.०१ असा सर्वोत्तम आणि त्यांच्या गोलंदाजांची सरासरी २७.१२ हीसुद्धा सर्वोत्तम आहे.

भक्कम सलामी हा इंग्लंडसाठी फार मोठा प्लस पॉईंट ठरणार आहे कारण गेल्या चार डावात इंग्लंडसाठी जेसन रॉय व जॉनी बेयरस्टो यांनी १२८, १६०, १२३ आणि १२४ धावांची सलामी दिलेली आहे. याउलट न्यूझीलंडच्या डावाची सलामी १, २, २९, ५, ०, १२, ० अशी डळमळीतच झालेली आहे. मात्र यातच न्यूझीलंडला सामना जिंकण्याची किल्लीसुद्धा आहे कारण इंग्लंडने यंदाच्या विश्वचषकात गमावलेले तीन सामने तेच आहेत ज्यांच्यात त्यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकापेक्षा अधिक विकेट गमावल्या आहेत. म्हणजे किवी गोलंदाज जर लवकर भगदाड पाडण्यात यशस्वी झाले तर न्यूझीलंडच्या शक्यता अधिक आहेत. यासंदर्भात ट्रेट बोल्ट न्यूझीलंडसाठी हुकुमी एक्का ठरू शकतो कारण त्याने १४ पैकी पाच डावात रॉय व बेयरस्टो यांना माघारी धाडण्यात यश मिळवले आहे. 

इंग्लंडच्या जो रूटने ५४९ धावा केल्या आहेत तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने ५४८ धावा केल्या आहेत. दोघांच्या धावांचा फरक फक्त एकच धावेचा असला तरी  विल्यमसनचे योगदान ३० टक्के तर रूटचे योगदान २० टक्के आहे. 

दोन्ही संघांकडे प्रत्येकी दोन गोलंदाज असे आहेत ज्यांनी प्रत्येकी १५ पेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने १७ व लॉकी फर्ग्युसनने १८ विकेट तर इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने १९ व मार्क वूडने १७ गडी बाद केले आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये आदिल रशिदच्या नावावर ११ बळी असले तरी त्याने ५.७९ च्या गतीने धावा दिल्या आहेत. याउलट न्यूझीलंडचा मिचेल सँटनर सहा बळी घेताना ४.८७ धावा असा किफायती ठरला आहे. 

नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे कारण यंदाच्या विश्वचषकातील अखेरच्या २२ सामन्यांपैकी १७ सामने प्रथम फलंदाजी करणाºया संघाने जिंकले आहेत आणि अंतिम सामना होणाºया लॉर्डस् मैदानावर हा बॅट फर्स्ट अ‍ॅडव्हांटेज लक्षणीय आहे कारण येथील शेवटचे चारही सामने प्रथम फलंदाजी करणाºया संघाने जिंकले आहेत. 

लॉर्डस्वर किवीज मात्र यजमानांचे लॉर्ड ठरलेले आहेत. या मैदानावर या दोन संघात झालेले आधीचे दोन्ही सामने (२००८, २०१३) न्यूझीलंडने जिंकले आहेत. 

या दोन संघातील ९० सामन्यांपैकी ४१ इंग्लंडने तर ४३ न्यूझीलंडने जिंकले आहेत. दोन टाय तर चार अनिर्णित आहेत. विश्वचषक स्पर्धेत या दोन संघातील ९ सामन्यांपैकी ४ इंग्लंडने तर ५ न्यूझीलंडने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये या दोन संघातील पाच विश्वचषक सामन्यांपैकी चार सामने मात्र इंग्लंडने जिंकले आहेत. या दोन संघातील अखेरच्या १० सामन्यांपैकी ७ इंग्लंडने जिंकले तर ३ न्यूझीलंडने जिंकले आहेत.

इंग्लंडच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासाचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी यंदा उपांत्य फेरी गाठलेल्या इतर तिनही संघांना (न्यूझीलंड, भारत आणि आॅस्ट्रेलिया) यांना मात देत १९९२ नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. 

विश्वचषकाच्या इतिहासात १९८७ व २०११ नंतर प्रथमच साखळी फेरीअंती पहिल्या स्थानी नसलेले संघ अंतिम फेरीत पोहचले आहेत. आणखी एक वैशिष्टय म्हणजे अंतिम फेरीत पोहचलेल्या दोन्ही संघांनी आपल्या प्रवासात भारतावर विजयाची नोंद केली आहे मात्र इंग्लंड व न्यूझीलंड या दोन्ही संघांना साखळी फेरीत मात्र पाकिस्तानने मात दिली होती. 

एकदाही विश्वचषक न जिंकलेल्या दोन संघादरम्यान १९७५, १९८७, १९९२ नंतर होणारा हा पहिलाच अंतिम सामना असणार आहे. 

गेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांवेळी गतविजेत्या संघाचे आव्हान संपविणारा संघ नवा विश्वविजेता ठरला होता. या समीकरणानुसार यंदा गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे आव्हान इंग्लडने उपांत्य फेरीत संपवले आहे त्यानुसार इंग्लंडच्या विजयाचे संकेत मानले जात आहेत. शिवाय गेल्या दोन वेळी यजमान संघच विश्वविजेता ठरलाय आणि यावेळेचे यजमान इंग्लंड हे अंतिम फेरीत आहेतच.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंड