Join us  

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये विराटचं नेमकं काय चुकलं?

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्यापासून सर्वाधिक लक्ष्य जर कोण होत असेल तर तो कर्णधार विराट कोहली. पण का पराभवामुळे भावनेच्या भारात कर्णधारासह इतरांचा बळी देणे खरोखरच योग्य ठरणार का?

By बाळकृष्ण परब | Published: July 13, 2019 5:54 PM

Open in App

- बाळकृष्ण परब विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्यापासून सर्वाधिक लक्ष्य जर कोण होत असेल तर तो कर्णधार विराट कोहली. गेल्या चार दिवसांपासून विराटच्या नेतृत्वात कसे दोष आहे, त्याची संघनिवड कशी चुकलीय, विराटचा अतिआक्रमकपणा कसा संघाला नडतोय. असे एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार सुरू आहे. काही विराटद्वेष्ट्यांनी तर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यासाठी मोर्चेबांधणीसुद्धा सुरू केली आहे. पण विश्वचषक स्पर्धेत आपली कामगिरी खरोखरच वाईट झाली आहे का? एका पराभवामुळे भावनेच्या भारात कर्णधारासह इतरांचा बळी देणे खरोखरच योग्य ठरणार का? तसंच विराटचं नेमकं काय चुकलं? याचाही विचार व्हायला हवा.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेचा विचार केल्यास उपांत्यफेरीतील फलंदाजीचा अपवाद वगळता आपण खूप चांगला खेळ केलाय. अगदी साखळीत इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवावेळीही आपल्या संघाने चांगली कामगिरी केली होती. अगदी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरुवातीच्या लढतीपासून पाहिल्यास परिस्थितीनुरुप संघात बदल करण्याची चतुरता आपला कर्णधार आणि संघव्यवस्थापनाने दाखवली. अगदी मैदानावरसुद्धा विराट कोहली बदललेला वाटला. काही अपवाद वगळता त्याने अतिआक्रमकपणा दाखवणे टाळले. तसेच रोहितप्रमाणे एकापाठोपाठ एक शतके ठोकता आली नाही तरी विराटने फलंदाजीतही सातत्य राखले. संपूर्ण स्पर्धेत तो केवळ एकदाच एकेरी धावांवर बाद झाला आणि तो सामना आपण गमावला. दुर्दैवाने तो सामना होता न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीचा.आता विराटचं काय चुकलं याचा विचार करायचा झाल्यास विश्वचषकासाठीच्या संघबांधणीमध्ये विराटकडून नक्कीच काही चुका झाल्या, हे मान्य करावे लागेल. अगदी उपांत्य फेरीतून गाशा गुंडाळेपर्यंत विराट आणि संघव्यवस्थापन परफेक्ट इलेव्हनच्या शोधात राहिले. खरंतर हे काम सहा महिने आधीच व्हायला हवे होते. पण ते झाले नाही. चौथ्या क्रमांकाबाबत अक्षम्य गोंधळ घातला गेला. त्यामुळे कुठे कुठे शोधू तुला असा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजांचा शोध सुरू राहिला. महेंद्रसिंग धोनीची बदलेली फलंदाजीची शैली विचारात घेता या क्रमांकावर तो चांगला पर्याय ठरला असता. पण त्याला आजमावले गेले नाही. नियमित फलंदाज असलेल्या केदार जाधवला संघाबाहेर करणेही आपले नुकसान करून गेले. पण यात सर्वस्वी विराटचाच दोष आहे असे म्हणता येणार नाही. कारण तुम्ही जर व्यावसायिक क्रिकेट खेळत असाल तर तुम्हाला मिळालेल्या संधीची आणि तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. मधल्या फळीत ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी जबाबदारीने खेळ केला नाही. उपांत्य फेरीत ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी मारलेले बेजबाबदार फटके हे त्याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. 
 आता वरच्या फळीतील तिन्ही फलंदाज चांगला खेळ करत असल्याने मधल्या फळीला पुरेशी संधी मिळाली नाही. त्यामुळे कसोटीची वेळ आली तेव्हा मधली फळी अपयशी ठरली, असा युक्तिवाद केला जातोय, त्यालाही काही अर्थ नाही. त्यात धोनीला खालच्या फळीत खेळवण्यावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पण धोनीचे संघातील स्थान पाहता तो शकीब अल हसनप्रमाणे फलंदाजीत वरचा क्रमांक निश्चितच मागून घेऊ शकला असता. दुसरी गोष्ट म्हणजे वयोमानाप्रमाणे आक्रमक, फटकेबाज धोनी कधीच अस्तास गेलाय. त्यामुळे त्याच्याकडून तळाच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन हाणामारीची अपेक्षा ठेवणेही चुकीचेच होते. या स्पर्धेत आपली गोलंदाजी अपेक्षेपेक्षा चांगली झाली. जयप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या सर्वांनीच चांगली कामगिरी केली. पण शेवटच्या काही सामन्यांत चांगली गोलंदाजी करत असलेल्या शमीला संघाबाहेर ठेवणे अनाकलनीय होते. ही विराट कोहली आणि संधव्यवस्थापनाची गंभीर चूक मानली पाहिजे.
पण आता प्रश्न पडतो तो विश्वचषकातील पराभवाचे खापर विराटच्या डोक्यावर फोडून त्याला कर्णधारपदावरून दूर करायचे का हा. तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. कारण उपांत्य सामना वगळता आपण विश्वचषकात चांगला खेळ केलाय. संघात काही त्रुटी असल्या तरी आपला उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास बराच सहजपणे झाला. त्यातही गेल्या काही वर्षांत विराटच्या नेतृत्वाखाली आपल्या संघाची कामगिरी ही खूप चांगली झाली आहे. कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. तर वनडेतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अजूनही चांगली कामगिरी करतोय, ही बाब दुर्लक्षुन चालणारी नाही. तसेच एका सामन्यातील अपयशामुळे नेतृत्वबदल करून संघाची घडी विस्कटणे परवडणारे नाही. खेळामध्ये यशापयश हे येतच राहते. ते याआधीही अनेकांच्या वाट्याला आहे आहे. त्यामुळे आताही झालेल्या चुकांचा अभ्यास करून पुढील वाटचाल करणे संघाच्या हिताचे ठरेल.  

टॅग्स :विराट कोहलीवर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय