Join us  

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिज, बांगलादेश विजयासाठी उत्सुक

गेल, रसेलवर लक्ष; गुणतालिकेत झेप घेण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 3:03 AM

Open in App

टाँटन : आयसीसी विश्वचषकात विजयाचा धडाका केल्यानंतर सलग पराभवाचे तोंड पाहणारे बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघ सोमवारी आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांचे लक्ष्य विजयासह गुणतालिकेतील स्थान सुधारणे हेच असेल.वेस्ट इंडिजने पहिल्या समान्यात पाकिस्तानचा सात गड्यांनी पराभव केला. त्यानंतर हा संघ आॅस्ट्रेलिया तसेच इंग्लंडकडून पराभूत झाला, तर द. आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. बांगलादेशने पहिल्याच सामन्यात बलाढ्य द.आफ्रिकेला धूळ चारली होती. न्यूझीलंड आणि इंग्लंडकडून मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले. लंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघांचे चार सामन्यानंतर सारखे तीन गुण आहेत. त्यामुळेच हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत बाजी मारणार आहे.टाँटन मैदानाची स्थिती विंडीजच्या गोलंदजांना अनुकूल वाटते. बांगलादेश संघाचा आत्मविश्वासही उंचावला आहे. विश्वचषकाआधी आयर्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत या संघाने विंडीजला दोन साखळी सामन्यांपाठोपाठ अंतिम सामन्यातही पराभूत केले होते.विंडीजची कमकुवत बाजू फलंदाजी आहे. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध फलंदाजीतील उणिवा स्पष्ट झाल्या. इंग्लंडविरुद्ध ३० षटकात ३ बाद १४४ वरून हा संघ ४५ षटकात सर्वबाद २१२ असा मर्यादित राहिला होता. ख्रिस गेल आणि शाय होप यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. या संघाची डोकेदुखी काही खेळाडूंची दुखापत ही देखील आहे. आंद्रे रसेल व शेल्डन कोर्टल हे इंग्लंडविरुद्ध केवळ पाच षटके गोलंदाजी करू शकले होते.बांगलादेश शाकिब अल हसनच्या कामगिरीवर विसंबून आहे. त्याने आतापर्यंत चेंडू आणि बॅट या दोन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी केली. २६० धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशला गोलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत ३७ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी वेस्ट इंडिजने २१ सामने, तर बांगलादेशने १४ सामने जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील ४ सामने बांगलादेशने जिंकले असून एका सामन्यात वेस्ट इंडिजला विजय मिळाला आहे.दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत ४ सामने झाले असून यातील तीन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध २४४, तर बांगलादेशने वेस्ट इंडिजविरूद्ध १८२ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे. वेस्ट इंडिजची बांगलादेशविरुद्ध ५९ धावांची नीचांकी खेळी असून बांगलादेशची नीचांकी धावसंख्या५८ आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019वेस्ट इंडिजबांगलादेश