- ग्रॅमी स्मिथ लिहितात...
या विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व बघायला मिळत आहे. माझ्या मते वेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर सामने होणे सकारात्मक बाब आहे. सर्वश्रेष्ठ होण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर वेगळ्या आव्हानाला सामोरे जाऊ शकता, हे सिद्ध करावे लागेल. स्पर्धेच्या सुरुवातीला मोठी धावसंख्या नोंदवण्याच्या क्षमतेमुळे इंग्लंड संघाला जेतेपदाचा दावेदार मानले जात होते. पण, त्यासाठी परिस्थितीसोबत ताळमेळ साधणे आवश्यक आहे. मिचेल स्टार्क नव्या चेंडूने शानदार मारा करतो. तो नियंत्रित मारा करीत असून भेदक भासत आहे. यानंतर स्पर्धेत कमी धावसंख्येचे अधिक रंगतदार सामने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट रंगत वाढते आणि विश्वकप आणि टी२० विश्वकप याचे लक्ष्यही हेच असायला हवे.
फलंदाजीची चर्चा करता डेव्हिड वॉर्नरने कमालीची परिपक्वता दाखविली आहे. त्याने ५०० हून अधिक धावा फटकावल्या आहेत. आॅस्ट्रेलियाचा वॉर्नर आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांनी जवळजवळ प्रत्येक सामन्यात आपली भूमिका बजावली आहे. त्यांचे अपयश आता आश्चर्यचकित करणारे ठरेल. विंडीज संघाचे पॅकअप निराशाजनक आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला आणि आंद्रे रसेलचा फॉर्म बघितल्यानंतर विंडीज संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, असे वाटत होते. न्यूझीलंडविरुद्ध कार्लोस ब्रेथवेटचे शानदार शतक सर्वकाही स्पष्ट करणारे आहे. याचा अर्थ संघाकडे चांगली संधी होती, पण त्यांना लक्ष्य गाठता आले नाही.
भारतीय संघ शानदार फॉर्मात आहे. त्यांच्याकडे दिग्गज फलंदाज आहेत. धोनी, रोहित शर्मा व कोहली यांच्यामुळे फलंदाजी क्रम अन्य संघापुढे आव्हान उभे करण्यास सक्षम आहे, पण आतापर्यंत गोलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. भारताच्या दोन्ही फिरकीपटूंना मोक्याच्या क्षणी लय गवसली आहे. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांच्या रुपाने संघात शानदार वेगवान गोलंदाज आहेत. पण, धक्कादायक निकालांमुळे स्पर्धेची रंगत कायम आहे. आता आपल्याला कोरड्या खेळपट्ट्या मिळणार असून त्यावर होणारी कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.