बर्मिंगहॅम : मधल्या फळीच्या अपयशामुळे चिंतेत असलेला भारतीय संघ मंगळवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी मैदानात उतरेल. यावेळी भारतीय संघ अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे.
बांगलादेशला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या लढतीत कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. एजबस्टनच्या मैदानाची स्थिती बघितल्यानंतर भारतीय संघ केदार जाधव व युझवेंद्र चहल यांना वगळून भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजा यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देऊ शकतो.
मंगळवारी विजय मिळवला, तर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. बांगलादेशला उपांत्य फेरीसाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. भारताला आता क्रिकेटविश्वातील अव्वल अष्टपैलू शाकिब अल हसनच्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
महेंद्रसिंग धोनीची निराशाजनक कामगिरी व मधल्या फळीचे अपयश यामुळे भारतीय संघातील कमकुवत बाजू चव्हाट्यावर आली आहे. इंग्लंडविरुद्ध भारताने अखेरच्या पाच षटकांमध्ये केवळ ३९ धावा केल्या. त्यावेळी केदार जाधव व महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर होते. मोठे फटके खेळण्यासाठी त्यांना आलेल्या अपयशापेक्षा त्यांनी विशेष प्रयत्न न करणे चर्चेचा विषय ठरला.
संघ व्यवस्थापनाने मात्र धोनीची पाठराखण केली आहे. अशा स्थितीत जाधववर खापर फुटू शकते. त्यामुळे जडेजाला संघात स्थान मिळवण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी जाधवच्या तुलनेत जडेजा सहाव्या किंव्या सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना काही चांगले फटके खेळू शकतो, हा उद्देश आहे. त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी धावगतीवर लगाम लावू शकते आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्याला
तोड नाही.
एजबेस्टन मैदानाचा आकारही संघातील बदलासाठी कारण ठरू शकते. त्यात एका बाजूची सीमारेषा ६० मीटर पेक्षा कमी आहे. इंग्लंडच्या जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ आणि बेन स्टोक्स यांनी फिरकीपटू चहल व कुलदीप यादव यांच्याविरुद्ध रिव्हर्स स्विपचा चांगला वापर करीत लाभ घेतला होता.
अशा स्थितीत तमीम इक्बाल, शाकिब, मुशफिकुर रहीम, लिट्टन दास आणि महमुदुल्लाह यांच्यासारख्या फिरकी गोलंदाजी खेळण्यात तरबेज असलेल्या फलंदाजांविरुद्ध मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाºया फिरकीपटूंना खेळविणे जोखमीचे ठरू शकते. भुवनेश्वर तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे भारत स्पर्धेत प्रथमच ३ प्रमुख वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वात खराब गोलंदाजी (१० षटकांत बळी न घेता ८८ धावा) केल्यामुळे युझवेंद्र चहलला संघातून वगळले जाऊ शकते. (वृत्तसंस्था)
हेड-टू-हेड
दोन्ही संघांदरम्यान सन १९८८
पासून आतापर्यंत ३५ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, भारताने त्यापैकी २९ सामने, तर बांगलादेशने ५ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दोन्ही संघातील शेवटच्या पाच लढतींपैकी चार सामने भारताने, तर एक सामना बांगलादेशने जिंकला आहे.
दोन्ही संघ विश्वचषकात २००७ पासून तीनवेळा आमनेसामने आले असून, यातील दोन सामन्यांत भारताने, तर एका सामन्यात बांगलादेशने बाजी मारली आहे.
महत्त्वाचे
भारतासाठी महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेशची गोलंदाजी इंग्लंडप्रमाणे भेदक नाही. त्याचप्रमाणे ते शाकिबवर अधिक अवलंबून आहेत. त्याने स्पर्धेत आतापर्यंत ४७६ धावा फटकावण्या व्यतिरिक्त १० बळीही घेतले आहेत. गोलंदाजी ही बांगलादेश संघाची कमकुवत बाजू आहे आणि त्यामुळे विराट कोहलीची पाटा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास पसंती राहील. बांगलादेशसाठी सर्वांत मोठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा कर्णधार मशरफे मुर्तजा आहे. त्याने सहा सामन्यात आतापर्यंत केवळ एक बळी घेतला आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजतापासून. (भारतीय वेळेनुसार)