Join us  

ICC World Cup 2019: जिंकण्यासाठी श्रीलंकेला करावा लागेल ‘चमत्कार’

श्रीलंका संघ कामगिरीतील सातत्याच्या अभावाने चाचपडतो आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 2:12 AM

Open in App

- ग्रॅमी स्मिथअफगाणिस्तानविरुद्ध इतकी शानदार खेळी पाहिल्यानंतर मी या लेखाच्या सुरुवातीला इयॉन मोर्गनचा उल्लेख केला नाही, तर तो अन्याय ठरेल. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच तो इंग्लंडसाठी मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू ठरला आहे. पण नंतर सातत्याचा अभाव जाणवला. पण त्याने प्रयत्न सोडले नव्हते. कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपविताच तो संघाच्या भरवशाच्या खेळाडूंमध्ये सहभागी झाला. तो या खेळाकडे कसा पाहतो आणि कसा खेळतो, हे पाहणे माझ्यासाठी सुखद ठरले. कारकिर्दीच्या या वळणावर त्याचा झंझावात पाहणे शानदार होते. इंग्लंड संघात मधल्या फळीत वेगवान धावा काढण्यात मोर्गनचा वाटा मोलाचा ठरतो. द.आफ्रिका संघाकडे या विश्वचषकात असा एकही खेळाडू दिसला नाही. दुसरीकडे संकटाच्या काळात उत्कृष्टरीत्या निर्धारित लक्ष्यावर शिक्कामोर्तब करू शकतो, हे मॉर्गनने सिद्ध केले.श्रीलंका संघ कामगिरीतील सातत्याच्या अभावाने चाचपडतो आहे. विशेषत: संघाची मधली फळी फारच ढेपाळलेली दिसते. माझ्या मते, लंकेच्या आघाडीच्या फळीच्या तुलनेत मधली फळी अधिक अनुभवी आहे. अँजेलो मॅथ्यूज आणि तिसारा परेरा यांच्यासारख्या खेळाडूंचा भरणा आहे. तथापि, दोघांनीही आतापर्यंत निराशा केली. दोघांच्याही धावांची सरासरी क्रमश: १२ आणि १३ धावा आहे. अशा कामगिरीनंतर श्रीलंका संघाला काही सकारात्मक पैलू तपासावे लागतील. कडवी झुंज देण्यासाठी योग्य संयोजन निवडावे लागेल. जे कामगिरी करू शकतील, अशा खेळाडूंना खेळवावे लागेल.विश्वचषकानंतर द. आफ्रिकाप्रमाणे श्रीलंकेलाही पुढील स्पर्धांसाठी प्रभावी खेळाडूंचा पर्याय शोधावा लागणार आहे. मॉर्गनने इंग्लंडसाठी जे केले, ते इतर खेळाडूंनी आपापल्या संघांसाठी करणे गरजेचे आहे. यासाठी व्यवस्थापन, कर्णधार, निवडकर्ते आणि खेळाडूंनी एक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे. लंकेविरुद्ध विजय साजरा केल्यास इंग्लंडचा पाचवा विजय ठरेल. पण श्रीलंकेला हेडिंग्ले येथे होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास सर्वात मोठी कामगिरी म्हणजे ‘चमत्कार’ करावा लागणार आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019श्रीलंका