- स्वदेश घाणेकर
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. १५ सदस्यीय संघात दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा ही तीन नावं चर्चेचा विषय ठरत आहेत. इंग्लिश कंडिशनचा विचार करता संघात अनुभवी खेळाडू असणे गरजेचे होतेच, पण केवळ ९ वन डे आणि ९ ट्वेंटी-२० सामने खेळणारा विजय शंकर हा खटकणारा फॅक्टर ठरत आहे. हार्दिक पांड्या असताना शंकर कशाला? त्याच्याजागी अतिरिक्त जलदगती गोलंदाज खेळवता आला असता ना ? पण निवड समितीने घेतलेला निर्णय हा खूप विचारपूर्वक आहे... कसा; चला जाणून घेऊया...
![]()
भारतीय वन डे संघात सलामीला फार पर्याय उपलब्ध नव्हतेच. त्यामुळे रोहित शर्मा आणि शिखर धवन हीच पहिली पसंती होती. धवनच्या फॉर्मचा विचार करताना पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल ही नावं चर्चेत आली. पण अनुभवाचा विचार करता धवनच भारी होता. सातत्य दाखवता न आल्याने रहाणेची संधी हुकली. त्यामुळे उगाच रहाणेवर अन्याय झाला वैगरे ओरडण्याची गरज नाही. राहुल संघात राखीव ओपनर म्हणून आहे, परंतु त्याला संधी मिळेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अशात रहाणेला घेऊन खेळवले नसते तरी 'अन्याय झाला' ही बोंब ठोकलीच असती.
![]()
कर्णधार विराट कोहली तिसऱ्या की चौथ्या स्थानावर खेळणार; याचे उत्तरही मिळाले आहे. निवड समितीने चौथ्या स्थानासाठी केदार जाधव आणि विजय शंकर हे पर्याय ठेवले. गरज पडल्यास लोकेश राहुल तिसऱ्या आणि कोहली चौथ्या अशीही क्रमवारी आजमावली जाऊ शकते. जाधव ६-७ व्या स्थानासाठी परफेक्ट आहे. अशात शंकर कशाला, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. शंकरने न्यूझीलंड दौऱ्यात समाधानकारक कामगिरी केली. मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीच त्यानं सोनं केलं. शिवाय तो मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे इंग्लिश कंडिशनमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो.
![]()
फलंदाज म्हणून चौथ्या स्थानासाठीही शंकरचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. अंबाती रायुडूचा फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टीमुळे तो संघात फिट बसतच नव्हता. त्याच्याजागी शंकर हा कधीही सक्षम पर्याय आहे. उंची आणि मोठे फटके मारण्यासाठी लागणारी ताकद त्याच्याकडे आहे. शिवाय त्याची गोलंदाजीत मिळणारी मदत दुर्लक्षित करून चालणार नाही. हार्दिक पांड्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर ही झेप मारली आहे. महेंद्रसिंग धोनीशिवाय हा संघ पूर्ण होऊच शकला नसता. फलंदाजीत त्याचे योगदान फार मिळणार नसले तरी त्याच्यासारखी डिसीजन पॉवर कोहलीलाही येणार नाही. अडीअडचणीत तोच संघाचा तारणहार आहे.
![]()
फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यशस्वीरीत्या पेलतील. त्यात रवींद्र जडेजाच्या समावेशाने संघात स्पर्धा वाढली आहे. जडेजाचा समावेश हा खऱ्या अर्थाने सुखावणारा निर्णय आहे. समजा आपले फलंदाज ढेपाळले, तर तळाला एक फलंदाज म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो. कुलदीप, चहल आणि जसप्रीत बुमराह यांची फलंदाजीची बोंबच आहे.
![]()
अतिरिक्त जलदगती गोलंदाज खेळवावा की नको? निवड समितीही याच बुचकळ्यात पडलेली. इंग्लंडमध्ये जलदगती गोलंदाजाची अतिरिक्त फौज घेऊन जाणे कधीही चांगले. म्हणून चौथा पर्याय म्हणून अनुभवी इशांत शर्मापासून ते नवख्या खलील अहमद यांचा विचार करण्यात आला. पण एक अतिरिक्त गोलंदाज घेणे म्हणजे एक फलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू गमावणे. संघात हार्दिक पांड्या हा मध्यमगती गोलंदाज होताच. त्यामुळे आणखी एक गोलंदाज घेण्यापेक्षा अष्टपैलू खेळाडू घेतलेला केव्हाही बरा. हाच विचार करून शंकर आणि जडेजा यांचा समावेश करण्यात आला.
![]()
या संघातील ७ खेळाडू हे पुढील म्हणजेच २०२३ चा वर्ल्ड कप नक्की खेळतील. पुढच्या वर्ल्ड कपमध्ये हेच खेळाडू अनुभवी खेळाडू म्हणून फ्रंटफूटवर राहून संघाचे प्रतिनिधित्व करतील. हाही विचार निवड समितीने केला असावा आणि पंतच्या बाबतीत म्हणायचे तर धोनीनंतर संघात त्याची जागा पक्कीच आहे. या वर्ल्ड कपनंतर धोनी कदाचित निवृत्त होइल आणि पंतकडे २०२३ साठीचा अनुभव गोळा करण्याची पुरेपूर संधीही मिळेल. त्यामुळे आता त्याची संधी हुकली असली तरी भविष्य तोच आहे.
![]()
निवड समितीने उपलब्ध पर्यायांपैकी निवडलेला हा संतुलित संघ आहे असेच म्हणावे लागेल. आता या अनुभवी व युवा खेळाडूंची सांगड घालून तयार केलेल्या संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत धुमशान करायचं आहे. तसेही कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदारच आहे. आशा करूया की कोहली भारताला तिसरा वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात यशस्वी होवो.