Join us  

ICC World Cup 2019 : रिषभ पंत भारतीय संघात हवा होता, पाक खेळाडूनं व्यक्त केली खंत 

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 6:59 PM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच इंग्लंडमध्ये अनुभवी खेळाडूची आवश्यकता असल्याने कार्तिकची निवड करण्यात आल्याचे निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे या चर्चेवर पडदा पडला होता. पण, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलने रिषभ भारतीय संघात नसल्याची खंत व्यक्त केली. 

रिषभसारखा फटकेबाजी करणारा खेळाडू भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे, असे अजमल म्हणाला. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतही रिषभची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 11 सामन्यांत  336 धावा केल्या आहेत. अजमल म्हणाला,''भारताकडे राखीव फळीही मजबूत आहे. रिषभ हा चांगला फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने चांगली फलंदाजी केली आहे. भारतीय संघात त्याने नवसंजीवणी आणली. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत फलंदाज म्हणून त्याचा समावेश व्हायला हवा होता, परंतु निवड समितीला त्यात काही उणीवा जाणवल्या असतील.''

दरम्यान, अजमलने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ धोकादायक ठरू शकतील असे मत व्यक्त केले. तर  पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताला नमवण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल, असेही तो म्हणाला. ''मी भूतकाळाबद्दल कधीच चर्चा करत नाही. पाकिस्तान संघाला वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. पण, अधिक मेहनत घेतल्यास इंग्लंडमध्ये ते भारतीय संघावर विजय मिळवू शकतील. पाकिस्तानच्या संघाला शूभेच्छा.''

भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९रिषभ पंतदिनेश कार्तिकबीसीसीआयपाकिस्तान