Join us  

ICC World Cup 2019 : बांगलादेश-श्रीलंका सामन्यात पावसाचीच दमदार बॅटींग, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

पावसाचा जोर एवढा होता की, या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 6:40 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेश-श्रीलंका सामन्यात पावसाचीच दमदार बॅटींग पाहायला मिळाली. पावसाचा जोर एवढा होता की, या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. अखेर आयसीसीने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

या सामन्यापूर्वी श्रीलंकेचे तीन सामने झाले होते. या तीन सामन्यांमध्ये श्रीलंकेला एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. श्रीलंकेचा एक सामना यापूर्वी पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे श्रीलंकेच्या खात्यामध्ये तीन गुण होते. हा सामनाही रद्द झाल्यामुळे श्रीलंकेच्या खात्यामध्ये आता चार गुण होतील.

बांगलादेशने या सामन्यापूर्वी तीन लढती खेळल्या होत्या. बांगलादेशला दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला पराभव करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. आता श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना रद्द करावा लागला आहे. त्यामुळे आता चार सामन्यांनंतर त्यांच्या खात्यामध्ये चार गुण असतील.

लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण...

 विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. त्यामध्येच त्यांना अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या रुपात अजून एक धक्का बसू शकतो. कारण लसिथ मलिंगा हा मायदेशी परतणार आहे. मायदेशी परतण्याचे कारण त्याने श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला सांगितले असून त्यांनी मलिंगाला परवानगी दिली आहे.

आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये श्रीलंकेला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. श्रीलंकेला अफगाणिस्तानवर विजय मिळवता आला होता. या विजयात मलिंगाचाही वाटा होता. त्यामुळे आता मलिंगा संघात नसेल तर श्रीलंकेचे काय होणार, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामधील सामना होणार होता. पण पावसामुळे हा सामना अद्याप होऊ शकलेला नाही. बांगलादेविरुद्धच्या सामन्यानंतर मलिंगा मायदेशी परतणार आहे.

मलिंगाची सासू कांती परेरा यांचे निधन झाले आहे. कांती यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी मलिंगा कोलंबोला परतणार आहे. त्यानंतर मात्र मलिंगा इंग्लंडमध्ये परतणार आहे. पण मलिंगा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात परतणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

याबाबत श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने सांगितले की, " मलिंगाच्या सासूचे निधन झाले आहे आणि त्याला अंतिम संस्कार करण्यासाठी कोलंबोला जावे लागणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर तो श्रीलंकेला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो संघात दाखल होईल, अशी आम्हाला आशा आहे."

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बांगलादेशश्रीलंका