- अयाझ मेमन (सल्लागार संपादक)
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ पाकिस्तावरील आपल्या विजयाचा आनंद साजरा करत होता आणि अफगाणिस्तानविरुद्धची तयारीही सुरू होती. मात्र त्याचवेळी बुधवारी अनपेक्षितरीत्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला की, शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला.
शिखर ३० जूनच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी दुखापतीतून सावरेल, अशी शक्यता होती. मात्र त्याच्या हाताचे प्लास्टर जुलैपर्यंत कायम राहील, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर पडला. धवन चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र नशिब त्याच्यावर नाराज होते. पंतकडे आता विश्वचषकात उत्तम खेळ करण्याची संधी आहे.
भारताच्या साखळी फेरीला दोन टप्प्यात विभागले, तर पहिला चार सामन्यांचा टप्पा निश्चीतच चांगला राहिला. दुसऱ्या टप्प्यातील पाच सामन्यात भारत हीच विजयी लय कायम राखण्यास इच्छुक आहे. या पाच सामन्यातील ३ सामने जिंकून भारत उपांत्य फेरीत स्थान मिळवेल. पहिल्या टप्प्यातील चारही प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ होते. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला.
भारताला आता भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीकडे लक्ष द्यावे लागेल. कारण दुखापतीनंतरही भुवनेश्वर संघात कायम असून
संघ त्याच्या दुखापतीतून सावरण्याची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत खलील अहमदला संघात स्थान मिळू शकते. तो पाकविरुद्धच्या सामन्याआधी भारतात परतला आहे. त्याला पुन्हा बोलावले जाऊ शकते.