Join us  

ICC World Cup 2019 : बेभरवशी पाकिस्तानी; प्रेरणादायी बोल, सरावात बदल अन्  घडला पराक्रम

विंडीजनं पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी खिळखिळीत केली. तू हो पुढे मी येतोच... असाच काहीसा पाक फलंदाजांनी व्रत केल्याचे दिसले.

By स्वदेश घाणेकर | Published: June 03, 2019 7:43 PM

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेत आम्हाला अनप्रेडिक्टबल म्हणतायेत हे चांगलच आहे.. त्यामुळे निदान प्रतिस्पर्धी संघांत आमची दहशत तरी राहते, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याच्या या विधानाची खूप खिल्ली उडवली गेली. त्यात विंडिजविरुध्द शरणागती पत्करून पाक संघानं टीकाकारांना आयतं कोलीतं दिलं... माजी खेळाडूंनीही संघाचे विषेशत: सर्फराजचे कान टोचण्याची संधी सोडली नाही. पण, ती संधी साधताना त्यांनी खेळाडूंसमोर सातत्याने पूर्व कामगिरीचा इतिहास सांगितला. त्यानं नेमकं काय साध्य झालं हे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगण कठिणं होतं. पण त्याचा सकारात्मक परिणाम नक्की झाला.

विंडीजनं पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी खिळखिळीत केली. तू हो पुढे मी येतोच... असाच काहीसा पाक फलंदाजांनी व्रत केल्याचे दिसले. आंद्रे रसेल, जेसन होल्डर, ओशाने थॉमस हे काही जागतिक दर्जाचे गोलंदाज नक्की नाहीत. हा पण त्यांच्यात संधी साधूपणा नक्की आहे. तिच संधी पाकिस्तानच्या फलंदाजांनी दिली आणि विंडीजने पाहतापाहता २१.४ षटकांत पाकला गुंडाळले. आखूड, उसळी घेणारे चेंडू टाकून विंडीजच्या गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांना हैराण केले. पाक फलंदाजांची हिच कमकुवत बाजू विंडीजने हेरली. १०५ धावांवर माघारी फिरल्यानंतर पाकचा पराभव निश्चित झाला होता. मग काय सोशल मीडियापासून सुरू झालेली कानउघडणी... 

वर सांगितल्या प्रमाणे माजी खेळाडूंनी टीका केली खरी पण इतिहास सांगून प्रेरणा दिली. त्यामुळे खेळाडूंनी निराशा झटकली आणि पुन्हा नव्या दमाने सुरुवात केली. एव्हाना पाक फलंदाज बाऊंसरवर अपयशी ठरतात हे हेरून इंग्लंडने मार्क वूडला आज खेळवले. पण पाक संघ पूर्ण तयारीन मैदानावर उतरले होते. सराव सत्रात पाकच्या प्रत्येक फलंदाजाने केवळ आणि केवळ बाऊंसरवर खेळण्याचा सराव केला. त्यामुळेच आज इंग्लंडचे सर्व डावपेच व्यर्थ ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना हैराण केलेल्या ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स या जलदगती गोलंदाजांचा पाकने सफाईनं सामना केला. यांच्या गोलंदाजीवर ७.३० च्या सरासरीनं पाक फलंदाजांनी धावा केल्या, तर वूडला सावध खेळ करून हाताळले. 

पहिल्या सामन्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील निचांक खेळी करणाऱ्या पाकने यजमान आणि जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या इंग्लंडविरुद्ध ३४८ धावा कुटल्या. वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. आता सामन्याचा निकालही पाकिस्तानच्या बाजूनं लागला आहे.. त्यामुळेच पाकिस्तानला बेभरवशी का म्हणतात हे कळलचं असेल...  

टीप : १९९२चा वर्ल्ड कप आणि २०१७ चा चॅम्पिअयन्स कप स्पर्धेत पाकिस्त्तानने पहिला सामना गमावला होता. त्यानंतर काय चमत्कार घडला हे जगाला माहितेय.. तेव्हाही ते अनप्रेडिक्टेबल होते आणि आताही आहेत.

टॅग्स :पाकिस्तानवर्ल्ड कप 2019