Join us  

ICC World Cup 2019 : रोमांचक लढतीत विंडीजला नमवून न्यूझीलंडची अव्वलस्थानी झेप

अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या  5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 2:25 AM

Open in App

साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या  5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.  न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली.  शाय होप आणि निकोलस पूरन झटपट बाद झाले. मात्र स्फोटक ख्रिस गेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे वेस्ट इंडिजने लढतीत पुनरागमन केले. पण हेटमायर (54), जेसन होल्डर (0) आणि ख्रिस गेल (87) पाठोपाठ बाद झाल्याने विंडिजचा डाव कोलमडला. मात्र 2016 च्या क्रिकेट विश्वचषकातील फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कार्लोस ब्रेथवेटने एक बाजू लावून धरत सामन्यात रंगत आणली. त्याने केमार रॉच, शेल्डन कॉटरेल आणि ओडेंसे थॉमस यांच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या करत विंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. पण विंडीजला सात चेंडूत सहा धावांची गरज असताना एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात ब्रेथवेट बाद झाला आणि वेस्ट इंडिजचा संघर्ष संपला.  तत्पूर्वी कर्णधार केन विल्यमसनने फटकावलेल्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 291 धावा कुटल्या होत्या. वेस्ट इंडियने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर पहिल्याच षटकात न्यूझीलंडला दोन धक्के बसले. मात्र नंतर कर्णधार केन विल्यमसन 148 आणि रॉस टेलर 69 यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडला सुस्थितीत पोहोचवले.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019वेस्ट इंडिजन्यूझीलंड