Join us  

ICC World Cup 2019 : देव करो अन् बांगलादेश संघावर वीज पडो, पाकच्या माजी खेळाडूचे अजब साकडे

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा आणखी एक विजय आणि उपांत्य फेरीतील पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:17 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडचा आणखी एक विजय आणि उपांत्य फेरीतील पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. इंग्लंडने बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. सलग तीन पराभवांमुळे यजमान इंग्लंडवर स्पर्धेबाहेर फेकले जाण्याचे संकट ओढावले होते. पण, त्यातून त्यांनी कमबॅक केले आणि अखेर अंतिम चारमध्ये तिसरे स्थान पक्के केले. चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा दावा निश्चित आहे, परंतु पाकिस्तान-बांगलादेशचा औपचारिक सामना पार पडल्यानंतर ते जाहीर करण्यात येईल. पाकने या लढतीत विजय मिळवून किवींप्रमाणे समान 11 गुण कमावले तरी त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा अनिश्चितच आहे. तरीही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना संघ अजूनही उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकतो, असा आत्मविश्वास वाटत आहे.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ भारत (13), इंग्लंड ( 12) आणि न्यूझीलंड ( 11) यांचा क्रमांक येतो. पाकिस्तानने अखेरचा साखळी सामना जिंकल्यास त्यांचेही गुण 11 होतील. पण, नेट सरासरीच्या जोरावर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर येईल. न्यूझीलंडचा सध्याचा नेट रनरेट हा 0.175 असा आहे, तर पाकिस्तानचा -0.792 इतका आहे. तरीही पाकिस्तानचा माजी कसोटीपटू मोहम्मद युसूफने पाकिस्तान संघाला एखादी नैसर्गिक आपत्तीच वाचवू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

तो म्हणाला,''पाकिस्तान स्पर्धेबाहेर हे निश्चित आहे. सामना सुरू असताना नैसर्गिक आपत्ती येवो किंवा वीज पडून  प्रतिस्पर्धी खेळाडू अनफिट झाल्यास, तर आणि तरच पाक संघ अंतिम चौघांत प्रवेश करू शकेल.''  उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला असा विजय मिळवावा लागेलजर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत विजयासाठी किमान 350 धावा फटकवाव्या लागतील. तसेच 350 धावा फटकावल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला तरच पाकिस्तान उपांत्यफेरीत प्रवेश करू शकेल. 

दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल. 

तर तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानसा प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानबांगलादेश