Join us  

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजवर 'लॉर्ड' प्रसन्न, वर्ल्ड कप संघात स्फोटक फलंदाजाची एन्ट्री? 

ICC World Cup 2019: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर वेस्ट इंडिज संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 5:18 PM

Open in App

नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर वेस्ट इंडिज संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2016नंतर राष्ट्रीय संघाकडून एकही वन डे सामना न खेळलेला किरॉन पोलार्डला विंडीजच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. जेसन होल्डर याच्या नेतृत्वाखाली विंडीज संघ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, आयर्लंड व बांगलादेश यांचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत विंडीजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या मालिकेत विंडीजचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला असून त्याला बदली खेळाडू म्हणून पोलार्डला पाचारण केले जाऊ शकते. 

वेस्ट इंडिजने वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात पोलार्डला स्थान देण्यात आलेले नाही. पण, अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या 32 वर्षीय पोलार्डची संघात एन्ट्री होऊ शकते. गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार विंडीज संघाच्या निवड समितीचे प्रमुख रॉबर्ड हायनेस यांनी दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी पोलार्डच्या नावाची शिफारस केली आहे. पोलार्डच्या समावेशामुळे विंडीजची ताकद वाढणार आहे. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता अष्टपैलू पोलार्डच्या मनगटात आहे.

पोलार्डच्या समावेशामुळे सुनील अँब्रीसवर अन्याय होणार आहे. त्याचाही वर्ल्ड कप संघात समावेश नाही, परंतु तिरंगी मालिकेत त्याने चार सामन्यांत 92.67च्या सरासरीनं 278 धावा चोपल्या आहेत. 23 मे पर्यंत अंतिम संघ पाठवायचा आहे आणि दुखापतग्रस्त खेळाडू तंदुरुस्त न झाल्यास पोलार्डचा मार्ग मोकळा होईल. वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना 31 मेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पोलार्डने 101 वन डे सामन्यांत 2289 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं व 9 अर्धशतकं आहेत. शिवाय त्याने 50 विकेट्सही घेतल्या आहेत. 

वेस्ट इंडिज खेळाडू: जेसन होल्डर (कप्तान), आंद्रे रसेल, एश्ले नर्स, कार्लोस ब्रॅथवेट, क्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, एविन लुइस, फॅबियन एलेन, केमार रोच, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाई होप, शॅनन गॅब्रियल, शेल्डन कोटरेल, शिमरॉन हेटमायर.

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९वेस्ट इंडिज