Join us  

ICC World Cup 2019 : रॉय-बेअरस्टो जोडीनं मोडला 16 वर्षांपूर्वीचा विक्रम, रॉयच्या 153 धावा

ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 5:50 PM

Open in App

कार्डीफ, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली. 2011 व 2015 मध्ये बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला पराभवाची चव चाखवली होती आणि 2019मध्येही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. पण, इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना हैराण केले. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करताना 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. रॉय आणि बेअरस्टो या जोडीनं बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना 15 षटकांत शतकी भागीदारी केली. 20व्या षटकात बांगलादेशला ही जोडी फोडण्यात यश आले. मशरफे मोर्ताझानं बेअरस्टोला माघारी पाठवले. मेहिदी हसनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. बेअरस्टो 50 चेंडूंत 6 चौकारासह 51 धावा करून माघारी परतला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी करत 2003च्या वर्ल्ड कपचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी मार्व्हन अटापट्टू आणि सनथ जयसूर्या यांचा 126* धावांचा विक्रम मोडला. बेअरस्टो माघारी परतल्यानंतर जेसन रॉयनं जोरदार फटकेबाजी केली. त्यानं वन डे क्रिकेटमधील 9वे शतक झळकावले, तर वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. बांगलादेशविरुद्धही त्यानं प्रथमच शतकी खेळी केली. मेहीदी हसनने त्याला बाद केले. रॉयनं 121 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकार खेचून 153 धावांची खेळी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या फलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. 2011मध्ये अँण्ड्य्रू स्ट्रॉसने भारताविरुद्ध 158 धावा केल्या होत्या.   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडबांगलादेश