Join us  

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल नाही, केदारच्या तंदुरुस्तीनं अनेकांच्या आशा मावळल्या

ICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संभाव्य 15 जणांच्या चमूत बदल होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:44 AM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संभाव्य 15 जणांच्या चमूत बदल होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. केदार जाधवच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या संभाव्य संघात बदल अपेक्षित होता, परंतु केदार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची घोषणा निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केली. त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला किंवा अन्य कुणालाही संधी मिळण्याची शक्यताही विरली. 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे, परंतु भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या केदारला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बाद फेरीपूर्वीच स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. गतविजेत्या चेन्नईला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने एका धावेने पराभूत केले होते. पण, या काळात केदारने तंदुरुस्तीवर बरीच मेहनत घेतली आणि संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली केदार तंदुरुस्तीची परीक्षा पास झाला. ''केदार जाधव वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा वैद्यकीय अहवाल आम्हाला देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी तो संघासोबत लंडनला रवाना होईल,'' अशी माहिती निवड समिती प्रमुख प्रसाद यांनी दिली.  

केदारला तंदुरुस्त करण्यासाठी फरहार्ट ऑस्ट्रेलियाहून लवकर परतले आणि त्यांनी केदारला लवकरात लवकर बरे केले. त्यांनी हा अहवाल बीसीसीआयकडे सोपवला. केदारच्या समावेशामुळे भारताच्या मधल्या फळीची चिंता मिटली आहे. ''फरहार्ट यांच्याकडून सोमवारी आम्हाला वैद्यकीय अहवाल मिळाला आणि त्यावर आम्ही समाधानी आहोत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी केदार उपलब्ध असेल,'' असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

केदारने 59 वन डे सामन्यांत 43.48च्या सरासरीने 1174 धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 27 विकेट्सही आहेत. भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. केदार तंदुरुस्त झाला नसता तर अक्षर पटेल, अंबाती रायुडू आणि रिषभ पंत यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची चर्चा होती. मात्र, आता त्याला काही अर्थ राहिला नाही आणि भारताचा संभाव्य संघच वर्ल्ड कपसाठीचा अंतिम संघ असेल. दरम्यान 23 मे पर्यंत संघात बदल करण्याची मुभा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेली आहे.

टॅग्स :केदार जाधववर्ल्ड कप २०१९बीसीसीआयरिषभ पंत