Join us  

ICC World Cup 2019 : भारताने पाठवला सर्वात वयस्कर संघ; करणार का इतिहासाची पुनरावृत्ती? 

ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वात वयस्कर संघ पाठवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 5:02 PM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वात वयस्कर संघ पाठवला आहे. भारतीय संघाचे सरासरी वय 29.53 वर्ष असे आहे आणि त्यात महेंद्रसिंग धोनी ( 37 वर्ष) हा सर्वात वयस्कर, तर कुलदीप यादव ( 24 वर्ष) सर्वा युवा खेळाडू आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या दहा संघांमध्ये श्रीलंका ( 29.9) आणि दक्षिण आफ्रिका ( 29.5) यांचा भारतापाठोपाठ क्रमांक येतो.

1975 ते आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतचा हा वयस्कर संघ आहे. याआधी भारताने 2011 साली जो संघ वर्ल्ड कपमध्ये उतरवला होता त्याचे सरासरी वय 28.3 असे होते. 2011मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप उंचावला होता. त्यामुळे 2011प्रमाणे यंदाही भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल का? 1983साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली उतरलेला भारताचा संघ ( 27.10 वर्ष) वयस्कर होता आणि तेव्हाही भारताने वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहासाची पुनरावृत्ती करेल का, याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या युवा संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

1975 मध्ये भारतीय संघाचे सरासरी वय 26.8 वर्ष, तर 1979 मध्ये 26.6 वर्ष होते. 1987 मध्ये हे वय 26.2, 1992 मध्ये 25.4 असे होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा संघ सर्वात युवा आहे. त्यांच्या संघाचे सरासरी वय 27.27 वर्ष आहे, त्यापाठोपाठ अफगाणिस्तान ( 27.40) आणि पाकिस्तान ( 27.33) यांचा क्रमांक येतो. खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर ( 40 वर्ष ) हा वयस्कर खेळाडू आहे, तर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान ( 18वर्ष) युवा खेळाडू आहे. अनुभवाच्या बाबतीत धोनी आघाडीवर आहे. त्याने 338 वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.  त्याच्याशिवाय कोणत्याही खेळाडूने 300 वन डे सामने खेळलेले नाहीत.  

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीबीसीसीआय