- सुनील गावसकर लिहितात...
भारताची इंग्लंडविरुद्ध कामगिरी फरक निर्माण करणारी ठरली. सामन्यात अखेरच्या टप्प्यात भारत इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरी करू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. आधीचे सामने आणि हा सामना यातील फरक म्हणजे शिखर धवन जखमी होऊन बाहेर पडताच भारत दोन फलंदाजांचा संघ राहिला होता. हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज जबाबदारी स्वीकारत नाहीत. इंग्लंडविरुद्ध मिळालेले मोठे लक्ष्य गाठण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले. लोकेश राहुलमध्ये गुणवत्ता आहे; पण तो सातत्यपूर्ण खेळी करण्यात अपयशी ठरतो. गुणवत्ता आणि चिवटवृत्ती यात समन्वय साधायचा झाल्यास तेंडुलकर, द्रविड, सेहवाग किंवा कोहली आठवतात. राहुलच्या क्षमतेबद्दल दुमत नाही; पण या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसायचे झाल्यास त्याला दृढ मानसिकता सिद्ध करावी लागेल.
आमच्या वेळी कपिलमध्ये जी झुंजारवृत्ती दिसायची, ती रविवारी थोडी फार हार्दिक पांड्याच्या खेळात दिसली. कपिलसारखा पांड्यादेखील सामने जिंकून देईल, अशी आशा आहे. तो प्रत्येक सामन्यागणिक परिपक्व होत आहे. अखेरच्या तीन षटकात शमीने ४५ धावा मोजताच भारताने सामना गमावला. त्याने पाच गडी बाद केले असले तरी, षटकार मारण्याच्या शोधात मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांपुढे कसा मारा करावा, हे त्याला समजायला हवे होते. स्टोक्स धडाका करीत असताना फूलटॉस आणि आखूड टप्प्याचा चेंडू टाकणे योग्य नाही. दुर्दैवाने कर्णधार किंवा वरिष्ठ यांच्यापैकी कुणीही शमीला डावखुºया फलंदाजाविरुद्ध राऊंड द विकेट टाकण्याचा सल्ला दिला नाही. चांगल्या कामगिरीसाठी इंग्लंडला श्रेय द्यावेच लागेल.
सामन्यागणिक प्रगती साधणाºया बांगलादेशविरूद्ध भारताला पुढील सामना खेळायचा आहे. इंग्लंडविरुद्ध हरल्यानंतर भारताने बांगलादेशला सहजतेने घेऊ नये. शाकिबने स्पर्धेत आतापर्यंत चौफेर कामगिरी केली असून, मुशफिकूर रहीम हाही जोमात आहे. तमीम इक्बाल देखील नेहमीसारखा योगदान देत आहे. जेसन रॉयप्रमाणे एखाद्याने बांगलादेशला झकास सुरुवात करून दिल्यास आणि मधल्या फळीने धावसंख्येला आकार दिल्यास मोठ्या धावा होऊ शकतात. विंडीजविरुद्ध बांगलादेशने ३०० च्यावर धावांचा पाठलाग केल्याने क्षमता असल्याचे दिसून आले.
गोलंदाजी मात्र चिंतेचा विषय आहे. पण रोहित आणि कोहली यांना लवकर गुंडाळण्यात त्यांना यश आल्यास २००७ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.