Join us  

ICC World Cup 2019, IND vs AUS : हिटमॅन रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम 

ICC World Cup 2019, IND vs AUS :हिटमॅन रोहित शर्माने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 3:59 PM

Open in App

ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. ऑस्ट्रेलिया : हिटमॅन रोहित शर्माने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वीसावी धाव घेताच रोहितनं हा विक्रम केला. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत जिगरबाज शतकी खेळी करणाऱ्या रोहितच्या कामगिरीकडे आज सर्वांचे लक्ष आहे. आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत रोहितने नाबाद 122 धावांची खेळी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीमध्येही रोहितकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची कामगिरी नेहमीच दमदार झाली आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी रोहितला केवळ 20 धावांची गरज होती. त्यामुळे आज रोहितने 20 धावा फटकावल्या तर तो वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावणाऱ्या सचिन तेंडुलकर, व्हीव रिचर्डस आणि डेसमंड हेन्स या मोजक्या फलंदाजांच्या क्लबमघ्ये दाखल झाला.

विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला. आतापर्यंत व्हीव रिचर्ड्स यांनी 45 डावांत, सचिन तेंडुलकरने 51 डावांत आणि डेसमंड हेन्स यांनी 59 डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावल्या आहेत. मात्र रोहितने आतापर्यंत केवळ 37 डावांमध्येच 61.87 च्या जबरदस्त सरासरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 धावा फटकावल्या होत्या आणि त्यानं आजच्या सामन्यात 20 धावा करून 2000 धावांचा पल्ला पार केला. रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात शतकं आणि सात अर्धशतकं झळकावली आहेत. आज तो किती धावा करतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासचिन तेंडुलकर