Join us  

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीला विश्वास!

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 3:59 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली, त्यानंतर संघावर आणि कर्णधार सर्फराज अहमदवर चहुबाजूंनी टीका झाली. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही सर्फराजची चांगली कानउघाडणी केली. पण, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी संघाच्या बचावासाठी पुढे आला आहे. त्याने हा संघ वर्ल्ड कप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

पाकिस्तानला पहिल्याच सामन्या विंडीजने 7 विकेट राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी पाठवून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. फाखर जमान व बाबर आजम यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओशाने थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही तीन विकेट घेतल्या. विंडीजने 105 धावांचे माफक लक्ष्य 13.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलने 34 चेंडूंत 50 धावा चोपल्या. निकोलस पूरणने 19 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली. 

सोमवारी यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी सकारात्मक सुरुवात केली. सामन्यापूर्वी नेटमध्ये उसळी घेणाऱ्या चेंडूवर कसून सराव करणाऱ्या पाकच्या सलामीवीरांनी इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमवले. इमाम उल हक आणि फखर जमान यांनी 11 षटकातं 73 धावा करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. या सामन्याचा अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर आफ्रिदीनं ट्विट केलं. तो म्हणाला,'' संघातील प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि ते हा वर्ल्ड कप जिंकतील, असे मला मनापासून वाटते. कर्णधार सर्फराजसह सर्व खेळाडूंना शुभेच्छा. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून आत्मविश्वास कमवण्याचा प्रयत्न करा.'' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019शाहिद अफ्रिदीपाकिस्तानइंग्लंड