लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने 359 धावांचा डोंगर रचला. महेंद्रसिंग धोनी आणि लोकेश राहुल यांनी दमदार शतके लगावत भारताच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. पण या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली हा हसतंच सुटल्याचे पाहायला मिळाले. नेमके झाले होते तरी काय, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात झाली नसली तरी राहुल आणि धोनी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली आहे. धोनीने 78 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी केली.
धोनीने या सामन्यात झंझावाती शतक झळकावले. त्यावेळी भारतीय संघाने त्याचे अभिनंदन केले. कोहलीने धोनीला शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर कोहलीने हसत-हसत हा आनंद साजरा केल्याचे म्हटले जात आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपली छाप पाडू शकले नाहीत. विराट कोहलीने 47 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर राहुल आणि धोनी यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दमदार भागीदारी रचली.
भारताला यावेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण होते. पण राहुलने शतक झळकावत या स्थानाला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी साकारली. धोनीनेही राहुलला चांगली साथ दिली. राहुल बाद झाल्यावरही धोनीने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले.