Join us  

ICC Women's T20 World Cup : पाकिस्तानला नमवून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत

ICC Women's T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या रविवारी पाकिस्तान महिला संघावर 17 धावांनी मात करताना उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 12:44 PM

Open in App

ICC Women's T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या रविवारी पाकिस्तान महिला संघावर 17 धावांनी मात करताना उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 136 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 5 बाद 119 धावा करता आल्या. आफ्रिकेची 20 वर्षीय फलंदाज लॉरा वोल्व्हार्डला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारतीय संघानंतर अंतिम चारमध्ये प्रवेश करणारा आफ्रिका हा दुसरा संघ ठरला आहे. 

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना अपयश आले. आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर 17 धावांत माघारी पाठवून पाकिस्ताननं सामन्यावर पकड निर्माण केली. पण, मॅरिझाने कॅप्प हीनं वोल्व्हार्डसह आफ्रिकेचा डाव सावरला. कॅप्पनं 32 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारांसह 31 धावा केल्या. कॅप्प माघारी परतल्यानंतर वोल्व्हार्डनं सामन्याची सूत्र हाती घेताना 36 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 53 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेनं 6 बाद 136 धावा केल्या. पाकिस्तानच्या डायना बेगनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुनीबा अली ( 12) लगेच माघारी परतली. त्यानंतर उमैमा सोहेल ( 0) आणि निदा दार ( 3) यांनाही झटपट माघारी पाठवण्यात आफ्रिकेला यश आलं. कर्णधार जवेरीया खान आणि आलिया रियाझ यांनी संघर्ष केला. पण, त्यांना अपयश आलं. जवेरीयानं 34 चेंडूंत 31 धावा केल्या. तर आलिया 32 चेंडूंत 39 धावांवर नाबाद राहिली. पाकिस्तानला 20 षटकांत 5 बाद 119 धावा करता आल्या. आफ्रिकेनं 17 धावांनी हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकपाकिस्तानद. आफ्रिका