Join us  

आयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ

पुजारा अव्वल पाचमध्ये; बुमराहचीही चमक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:38 AM

Open in App

दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे आणि चेतेश्वर पुजारा अव्वल पाचमध्ये दाखल झाला आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने आपले सर्वोत्तम मानांकन मिळवले असून तो ३३व्या स्थानी आहे.पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटीत १२३ व ७१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने फलंदाजी क्रमवारीत जो रुट व डेव्हिड वॉर्नर यांना पिछाडीवर सोडत चौथे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्टीव्हन स्मिथच्या तुलनेत तो ५५ मानांकन गुण पिछाडीवर असून पाचव्या स्थानी असलेल्या रुटच्या तुलनेत ३९ मानांकन गुणांनी आघाडीवर आहे.कोहली फलंदाजी क्रमवारीत आघाडीवर आहे, पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन झपाट्याने त्याच्या जवळ येत आहे.  पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करणारा विलियम्सन ९०० मानांकन गुण मिळवणारा न्यूझीलंडचा पहिला व जगातील ३२ वा फलंदाज ठरला. विलियम्सनने अबुधाबीत न्यूझीलंडच्या १२३ धावांच्या विजयात ८९ व १३९ धावांच्या खेळी केल्या. त्याला ३७ गुणांचा लाभ झाला. त्याने ९१३ गुणांसह स्मिथला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.कोहलीला पहिल्या कसोटीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने ३ व ३४ धावा केल्या. त्यामुळे त्याला १५ मानांकन गुणांचे नुकसान सोसावे लागले. आता कोहलीच्या खात्यात ९२० मानांकन गुण आहेत. कोहली व विलियम्सन यांच्यात ७ मानांकन गुणांचे अंतर आहे. भारतीय कर्णधाराला अव्वल स्थान अधिक भक्कम करण्यासाठी पर्थमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. अन्यथा त्याला अव्वल स्थान गमवावे लागू शकते. अजिंक्य रहाणेने दोन स्थानांनी १७ वे स्थान गाठले. लोकेश राहुल (२६), मुरली विजय (४५) व रोहित शर्मा (५३) यांची घसरण झाली आहे. नव्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरिसने फलंदाजी क्रमवारीत ११६ व्या स्थानासह मानांकनामध्ये प्रवेश नोंदवला तर न्यूझीलंडचा ऑफ स्पिनर विलियम सोमरविलेने गोलंदाजी मानांकनामध्ये ६३ व्या आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफरिदीने १११ वे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने दोन स्थानांची प्रगती केली असून तो १६ व्या स्थानी आहे.गोलंदाजीत बुमराहने पाडली छापगोलंदाजांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने कारकिर्दीतील सर्वोत्तम ३३ वे स्थान पटकावले आहे. त्याने सामन्यात सहा बळी घेतले. त्यामुळे त्याला पाच स्थानांचा लाभ झाला. फिरकीपटू अश्विनने एका स्थानाने प्रगती केली असून तो सहाव्या स्थानी आहे. मोहम्मद शमी २३ व्या आणि ईशांत शर्मा २७ व्या स्थानी कायम आहेत. 

टॅग्स :विराट कोहली