Join us  

ICC T20 World Cup 2020: भारताला विश्वविजेतेपदाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढत आज

अंतिम सामन्याची ७५ हजारावर तिकीट विक्री झाली. एकूण आसनक्षमता ९० हजार इतकी आहे. महिला क्रिकेटच्या कुठल्याही सामन्यासाठी ही अनपेक्षित उपस्थिती असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 2:28 AM

Open in App

मेलबोर्न : पहिल्यांदा जेतेपदाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाला आज, रविवारी मेलबोर्न क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या टी-२० महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सध्याचा चॅम्पियन आॅस्ट्रेलियावर विजय नोंदवून ऐतिहासिक विश्वविजेतेपदाची संधी आहे. त्यासाठी प्रेक्षकांच्या विक्रमी उपस्थितीत दडपण झुगारून यजमानांवर वर्चस्व गाजविण्याचे अवघड आव्हान असेल.

भारताने गटात अपराजित राहून अंतिम फेरी गाठली. चार विजयांपैकी सलामीच्या सामन्यात यजमानांना भारताने १७ धावांनी पराभूत केले होते. इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना पावसात वाहून गेल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारताच्या यशात १६ वर्षांच्या शेफाली वर्माची आक्रमक फटकेबाजी आणि फिरकी गोलंदाजांची कामगिरी अधोरेखित करणारी ठरली. तरीही प्रथमच जेतेपद पटकवायचे झाल्यास स्मृती मानधना, हरमन कौर यांच्यासह मधल्या फळीतील फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील.

दुसरीकडे भारतीय संघ मोठ्या सामन्यात दडपणात येतो. २०१७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तसेच २०१९ च्या टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा फटका सहन करावा लागला होता. यावेळी शेफाली आणि स्मृती यांच्याकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. त्यानंतर मधल्या फळीला धावडोंगर उभारावा लागेल. गोलंदाजीत लेगस्पिनर पूनम यादव आणि शिखा पांडे यांच्यासह राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यावर भिस्त असेल. आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पूनमच्या माºयाचा चांगलाच धसकाघेतला आहे.

अंतिम सामन्याची ७५ हजारावर तिकीट विक्री झाली. एकूण आसनक्षमता ९० हजार इतकी आहे. महिला क्रिकेटच्या कुठल्याही सामन्यासाठी ही अनपेक्षित उपस्थिती असेल. मेग लेनिंगच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलिया संघ घरच्या प्रेक्षकापुढे बाजी मारण्यास सज्ज आहे. पुरुष संघाचा गोलंदाज मिशेल स्टार्क हा पत्नी आणि यष्टिरक्षक एलिसा हिली हिला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. हरमनप्रीतच्या शब्दांमुळे प्रेरणा मिळाली : पूनम यादवआॅस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या विश्वचषकातील सलामीच्या लढतीत कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मला जे प्रोत्साहन दिले त्यामुळे प्रेरणा लाभल्याचे मत गोलंदाज पूनम यादव हिने व्यक्त केले. अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला २८ वर्षांची पूनम म्हणाली, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात पहिल्या षटकात माझ्या चेंडूवर षटकार लागला तेव्हा हरमनने माझ्या जवळ येत, ‘पूनम तू आमची सर्वांत अनुभवी खेळाडू आहेस. तुझ्याकडून याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे,’ या शब्दात मला धीर दिला होता. तिच्या या शब्दांमुळे मला दमदार कामगिरीची प्रेरणा लाभली. ‘माझ्या कर्णधाराचा माझ्यावर इतका विश्वास असेल तर मी मुसंडी मारायलाच हवी. मी पुढच्याच चेंडूवर गडी बाद केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.’ पूनमने त्या सामन्यात चार गडी बाद केले. स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाºयात पूनम अव्वल स्थानावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणारी पूनम याआधी बोटाच्या दुखापतीमुळे तिरंगी मालिका खेळली नव्हती.शेफाली वर्माला रोखायला हवे : व्हाईटभारताची सलामीची आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा हिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोखण्यासाठी आॅस्ट्रेलियाने मानसिक कणखरता दाखवायला हवी, असे इंग्लंडची सलामीची फलंदाज डेनी व्हाईट हिने म्हटले आहे. १६ वर्षांच्या शेफालीने १६१ धावा केल्या आहेत. व्हाईट म्हणाली, ‘शेफालीचा कमकुवतपणा काय आहे, हे लक्षात असू द्या. तिच्याविरुद्ध मानसिकता पणाला लावून गोलंदाजी केल्यास शेफालीच्या उणिवा चव्हाट्यावर येतील.’ व्हाईटने २०१९ च्या महिला टी-२० चॅलेंजमध्ये शेफालीसोबत ड्रेसिंगरूम शेअर केले होते. शेफाली अपयशी ठरल्यास कमालीची भावूक होते. हे क्रिकेट आहे, अधिक ताण घेऊ नको, असे मी वारंवार शेफालीला समजावले आहे. मैदानात आल्या आल्या मोठे फटके मारण्याचे दडपण असल्याने अपयश येण्याची दाट शक्यता असते. हेच सूत्र ध्यानात ठेवून शेफालीविरुद्ध डावपेच आखा, असा सल्ला व्हाईटने आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिला.आठ दिवसांच्या विश्रांतीमुळे तयारीत खोळंबा झाला. प्रेक्षकांच्या विक्रमी उपस्थितीपुढे दमदार कामगिरीचे आव्हान संघापुढे असेल. नेटमध्ये सराव केला खरा; मात्र इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना न झाल्याने थोडा फरक पडला आहे. संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून, संघासाठी काय करायचे याची सर्वांना जाणीव आहे. इतक्या प्रेक्षकांपुढे खेळणे हा शानदार अनुभव असेल. आम्ही सकारात्मकपणे खेळून विजय मिळविण्याच्या बेतात आहोत. रविवारचा दिवस नव्याने उजाडणार आणि नवी सुरुवात असेल, इतकेच आमच्या डोक्यात आहे. - हरमनप्रीत कौर, कर्णधार भारत.भारताची भेदक फिरकी गोलंदाजी लीलया खेळून काढण्यासाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. फिरकी माºयापुढे तासन्तास सराव केला. आम्ही केवळ पूनम यादवच्या माºयाने चिंतित नाही. राजेश्वरी गायकवाड यासारखी आणखी एक फिरकीपटू आहे. सामन्याचे चित्र बदलणारे अनेक गोलंदाज भारताकडे असल्याने त्यांच्याविरुद्ध निश्चित डावपेच आहेत. मैदानावर परिस्थितीशी ताळमेळ साधायचा आहे. आमचे गोलंदाज भारताची आघाडीची फळी लवकर बाद करतील, असा मला विश्वास आहे.’ - मेग लेनिंग, कर्णधार ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी सहा महिन्यांसाठी बाहेरमेलबोर्न : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी ही मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर राहील. सध्याच्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध लढतीत पेरीच्या मांसपेशी दुखावल्या होत्या. त्यातून सावरण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. भारताविरुद्ध अंतिम सामन्यादरम्यान मी बाहेर बसणार; पण माझ्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पेरी म्हणाली.

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया