आजची स्त्री ही ‘चूल व मूल’ यात गुरफटणारी नक्कीच नाही. रूढीच्या खोलखोल चाकोरीतून सामाजिक जीवनाचा खटारा रे-रे करीत चालला आहे, ही लेखकांनी वर्णन केलेली स्थिती स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे कायम होती. आकाश कवेत घेण्यासाठी झेपावणारी कल्पना चावला असो किंवा ते स्वप्न साकारणारी सुनीता विलियम्स असो, स्वप्न सर्वच बघतात, पण ते साकार करण्यासाठी मोजकेच मेहनत घेतात आणि तेच यशस्वी होतात. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा उत्साह बघितल्यानंतर त्यांचे स्वप्न साकार होण्याची प्रचिती येते.
भारताचा टी२० महिला संघ विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होत आहे. गेल्या वेळी एकदिवसीय विश्वचषकाचे स्वप्न थोडक्यात हुकले, या वेळी मात्र ते साध्य करायचेच या उद्देशाने भारतीय महिला संघ आॅस्ट्रेलियात २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० या कालावधीत होणाऱ्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्यास खेळेल. डब्ल्यू. व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाºया भारतीय संघाची भिस्त हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, अनुजा पाटील या रणरागिणींवर आहे.
भारताची सलामी लढत यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध २१ फेब्रुवारी रोजी सिडनी मैदानावर होईल. ‘अ’ गटात भारतासह यजमान आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे तर ‘ब’ गटात इंग्लंड, आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान व आयर्लंड आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरी गाठतील.
हरमनप्रीत, स्मृतीसारख्या युवा खेळाडूंमध्ये संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. २०१८ मध्ये विंडीजमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात भारतीयांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते.
दुसरीकडे, आॅस्ट्रेलियामध्येच २४ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया पुरुषांची टी२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा आतापासूनच रंगली आहे.
२००७ साली झालेला पहिला विश्वचषक भारताने जिंकला होता. पण त्यानंतर भारताला एकदाही हा विश्वचषक पटकावता आलेला नाही. त्याचवेळी, वेस्ट इंडिजने मात्र दोनदा हा विश्वचषक उंचावला असून ते गतविजेतेही आहेत. या विश्वचषकासाठी भारताची संघबांधणी जवळपास झालेली आहे. यानुसार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा पर्याय म्हणून रिषभ पंतला खेळवण्यात येईल. पंतला टी२० मध्ये छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे त्यालाच या विश्वचषकात संधी देणार की त्यासाठीही पर्यायी खेळाडू ठेवणार, हे काही दिवसांमध्येच समजेल.
गोलंदाजी भारतासाठी जमेची बाजू ठरेल. कारण आॅस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळतो व वेगाने येतोे. त्यासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनीसारख्या वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकेल. हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलूही निर्णायक ठरू शकतो. फलंदाजीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे सक्षम आहेत. त्यामुळेच भारतीय संघ यंदा संभाव्य विश्वविजेता मानला जात आहे.
२०२० वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी खºया अर्थाने टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी ठरणार आहे. कारण यंदा दोन टी२० विश्वचषक स्पर्धांचा थरार अनुभवण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळेल. फेब्रुवारी-मार्च दरम्यान रंगणारा महिला टी२० विश्वचषक व त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुरुष टी२० विश्वचषक होणार असल्याने यंदाचे वर्ष क्रिकेटविश्वासाठी पर्वणी असेल.