दुबई : दक्षिण आफ्रिका दौ-यात ९०० मानांकन गुणांची मजल मारण्याच्या विराट कोहलीच्या आशेला केपटाऊन कसोटीतील निराशाजनक कामगिरीनंतर मोठा धक्का बसला आहे. त्यात भारतीय कर्णधाराला १३ मानांकन गुणांचे नुकसान सहन करावे लागले असून आयसीसी खेळाडूंच्या ताज्या विश्वक्रमवारीत त्याची तिस-या स्थानी घसरण झाली आहे.
चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय व रोहित शर्मा यांच्यासारख्या भारताच्या अन्य फलंदाजांनाही न्यूलँड््समधील निराशाजनक कामगिरीचा फटका बसला आहे, तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. मोहम्मद शमी अव्वल २० मध्ये सामील भारताचा तिसरा गोलंदाज आहे. द. आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने ७२ धावांनी मिळवलेल्या विजयामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
कोहलीचे या कसोटीपूर्वी ८९३ मानांकन गुण होते. त्याचा फॉर्म बघता तो ९०० मानांकन गुणांपर्यंत पोहोचणार, असे वाटत होते, पण पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधाराला केवळ ५ व २६ धावांची खेळी करता आली. त्यामुळे त्याचे मानांकन गुण ८८० झाले.
दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत १४१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला २८ मानांकन गुणांचा लाभ झाला. त्याने कोहलीला पिछाडीवर सोडत दुसरे स्थान पटकावले. आॅस्ट्रेलियन कर्णधार ९४७ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी आहे.
पुजाराने २६ व ४ धावा केल्या. त्यामुळे त्याला २५ मानांकन गुणांचे नुकसान झाले. तो ८४८ मानांकन गुणांसह तिसºया स्थानावरून पाचव्या स्थानी घसरला.