Join us  

क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांचे तुफानी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या ३५०+ धावा

ICC ODI World Cup SA vs NZ Live : क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांच्या शतकाने आज पुण्याचे मैदान गाजवले. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये ३५० पार जाण्याची परंपरा आजही कायम राखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 5:51 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs NZ Live : शेवटचा वन डे वर्ल्ड कप खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला ( Quinton de Kock )  रोखणं गोलंदाजांची तगडी फौज असलेल्या संघांनाही अशक्य झालेय... न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने यंदाच्या वर्ल्ड कपमधील चौथे शतक झळकावले. त्याने आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी दोनशे धावांची भागीदारी केली. डेर ड्युसेन यानेही शतक झळकावले. त्याने शेवटच्या षटकांत डेव्हिड मिलरसह अक्षरशः वादळ आणले होते. आफ्रिकेने आणखी एकदा तीनशेपार धावांचा डोंगर उभा केला. 

क्विं'टन'! डी कॉकचे चौथे शतक; वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून रेकॉर्ड ब्रेकींग खेळी

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार टेम्बा बवुमा( २४) ९व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर क्विंटन व व्हॅन डेर ड्युसन यांनी डाव सावरला. क्विंटनने १०३ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि यंदाच्या पर्वात ५००+ धावा करणाऱ्या फलंदाजाचा पहिला मान पटकावला. त्याने डेर ड्युसेनसह शतकी भागीदारी पूर्ण केली आणि या वर्ल्ड कपमधील आफ्रिकन फलंदाजांकडून ही सातवी शतकी भागीदारी ठरली. यापैकी ५मध्ये क्विंटनचा सहभाग आहे. क्विंटनने षटकार खेचून यंदाच्या पर्वातील चौथे शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपच्या एका पर्वात ४ किंवा त्याहून अधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये क्विंटनचा समावेश झाला आहे. 

रोहित शर्माने २०१९मध्ये ५ शतकं झळकावली होती, तर कुमार संगकाराने २०१५ मध्ये ४ शतकं केलेली. आफ्रिकेकडून क्विंटनचे हे वन डेतील २१वे शतक ठरले आणि त्याने हर्षल गिब्सची बरोबरी केली. हाशिम आमला ( २७) व एबी डिव्हिलियर्स ( २५) आघाडीवर आहेत. ४०व्या षटकात टीम साऊदीला ही विकेट मिळवण्यात यश आलं. त्याने ११६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांची खेळी करताना डेर ड्युसेनसोबत १८९ चेंडूंत २०० धावा जोडल्या. डेर ड्युसेननेही १०१ चेंडूंत शतक पूर्ण करून आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. शतकानंतर डेर ड्युसेनची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने डेव्हिड मिलरसह ४३ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी केली. ४८व्या षटकात टीम साऊदीने विकेट मिळवली आणि डेर ड्युसेने ११८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह १३३ धावांवर बाद झाला. 

मिलरने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मिलरने ३० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ४ बाद ३५७ धावा केल्या. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपद. आफ्रिकान्यूझीलंडक्विन्टन डि कॉक