Join us  

स्वप्न भंगलं, हृदय तुटलं, टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं, वर्ल्डकप तर गेला, आता पुढे काय?

ICC CWC 2023, Ind Vs Aus: घरचं मैदान, लाखो प्रेक्षकांचा पाठिंबा, संपूर्ण संघानं पकडलेला जबरदस्त फॉर्म असं सारं काही अनुकूल असताना या संपूर्ण स्पर्धेतील आपल्या संघाचा एक वाईट दिवस हा नेमका फायनलमध्येच आला. नाणेफेकीपासून सगळीच गणितं चुकत गेली. अन् गेल्या दीड महिन्यांपासून स्वप्नवत सुरू असलेली वाटचाल एका निराशाजनक शेवटाकडे जाऊन थांबली.

By बाळकृष्ण परब | Published: November 20, 2023 7:48 PM

Open in App

- बाळकृष्ण परबअखेर ज्याची मनोमन भीती वाटत होती, तेच घडलं. रविवारी झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं आणि अब्जावधी भारतीयांचं विश्वविजेते होऊन क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. घरचं मैदान, लाखो प्रेक्षकांचा पाठिंबा, संपूर्ण संघानं पकडलेला जबरदस्त फॉर्म असं सारं काही अनुकूल असताना या संपूर्ण स्पर्धेतील आपल्या संघाचा एक वाईट दिवस हा नेमका फायनलमध्येच आला. नाणेफेकीपासून सगळीच गणितं चुकत गेली. गेल्या दीड महिन्यांपासून स्वप्नवत सुरू असलेली वाटचाल एका निराशाजनक शेवटाकडे जाऊन थांबली. ऑस्ट्रेलियन संघाने २००३ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दिलेला घाव भरून निघेल, असं वाटत असतानाच कांगारूंनी त्या जखमेवर कालौघात भरलेली खपली काढून त्यावर तिखटमीठ चोळलं. या पराभवाने काही क्रिकेट थांबणार नाही, पण कालच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाने दिलेली जखम बराच काळ भळभळत राहणार आहे. आता हे का घडलं? कसं घडलं? याचा हिशेबही मांडला जाईल, पण त्यातून हाती काय लागणार? हा एक प्रश्नच आहे. 

या पराभवाची आता अनेक कारणं सांगितली जातील. पण या  पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंतिम सामन्यातील आपली कामगिरी ही संपूर्ण स्पर्धेत केलेल्या खेळाला साजेशी झाली नाही. पहिल्यापासूनच आपला संघ कुठल्यातरी भयंकर दबावाखाली खेळतोय, असं दिसत होतं. या वर्ल्डकपमध्ये आपली कामगिरी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघापेक्षा कैक पटीने अधिक सरस झाली होती. आपण सलग दहा सामने जिंकून फायनल गाठली होती. त्यामुळे अपेक्षा निश्चितच वाढल्या होत्या. पण आपला कालचा खेळ हा लौकिकाला साजेसा झाला नाही. क्रिकेटमध्ये जरतरला फारसा अर्थ नसतो. पण काल आपला दिवसच नव्हता. या वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यापासून सेमीफायनलपर्यंत प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला खेळाडूंच्या कामगिरीसोबतच वेळ आणि नशिबाची सुरेख साथ मिळाली होती. आपल्या संघाची भट्टी एवढी जबरदस्त जुळून आली होती की, केवळ ११ पैकी ११ खेळाडूंनी खराब कामगिरी केली असती तर आपला पराभव झाला असता. दुर्दैवाने फायनलमध्ये तसंच घडलं. आपल्या एकाही खेळाडूनं लौकिकाला साजेशा खेळ केला नाही, त्याची अखेर अनपेक्षित निकालामध्ये झाली.

कांगारूंनी प्रथम फलंदाजीस बोलावल्यावर आपली सुरुवात ठिकठाक झाली होती. गिलला गमावलं तरी १० षटकांपर्यंत आपण ७५ धावांचा टप्पा ओलांडला होता. पण तिथे रोहित शर्माचा एक फटका चुकला आणि वर्ल्डकपमधील आपला मौका हुकला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रोहित बाद झाल्यावर जबाबदारी विराट कोहलीवर होती. पण पाठोपाठ बसलेल्या धक्क्यांमुळे तोही दबावात आल्याचं स्पष्ट दिसत होतं. कोहली आणि लोकेश राहुल खेळताना काहीसे अतिबचावात्मक झाले. चौकार-षटकार आटले. एवढंच काय एकेरी दुहेरी धावाही मिळेनाशा झाल्या. याच काळात संभ्याव्य धावसंख्या आणि डावाच्या उभारणीबाबतचं आपलं समिकरण चुकलं. धावाच होत नसल्याने दबाव वाढला. त्यात विराट दुर्दैवीरीत्या प्लेडऑन होत बाद झाल्याने परिस्थिती अगदीच बिघडली. जडेजा, सूर्यकुमार यांनी फलंदाजीत निराशा केली. आपलं फलंदाजीतील शेपूट तितकंसं मजबूत नसल्याने त्यांच्याकडून अपेक्षाच नव्हती. अखेरीस जिथे परिस्थिती पाहता विजयासाठी सव्वा तीनशेपार धावा होणं आवश्यक होतं. तिथे आपण २४० धावांवर धाप टाकली.

ही धावसंख्या विजय मिळवण्यासाठी पुरेशी नव्हती. पण आपल्या गोलंदाजांनी स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांना कमी धावसंख्येत गारद करण्याचा पराक्रम अनेकदा केलेला असल्याने काही तरी चमत्कार होईल, अशी भोळीभाबडी अपेक्षा होती. बुमराह शमीने त्या अपेक्षेला साजेशी सुरुवातही केली. पण आपल्या गोलंदाजीची धार पहिल्या पॉवर प्लेमध्येच बोथट झाली. मग जडेजा-कुलदीप चालेनासे झाले. तर सिराजवर सुरुवातीलाच प्रहार करून कांगारूंनी दबाव वाढवला. उरलं सुरलं काम शतकवीर ट्रॅव्हिस हेड आणि लाबुशेन यांनी मोठी भागीदारी करून पूर्ण केलं. एकूण काय तर दहा सामन्यांमधून जे काही कमावलं, ते आपण एका दिवसात गमावलं. मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यात आपण अपय़शी ठरलो. ऑस्ट्रेलियन संघाने निसंशयपणे सर्वोत्तम खेळ केला. आयसीसीच्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये एक वेगळाच ऑस्ट्रेलियन संघ उतरतो. ते त्याच प्रमाणे खेळले आणि जिंकले.  

वर्ल्डकप गमावल्यावर नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या सबबी शोधल्या जाताहेत. कुणी खेळाडूंच्या अतिआत्मविश्वासाला दोष देतोय. कुणी सामन्याबाबत तयार करण्यात आलेल्या वातावरणाला दोष देतोय. कुणी नेत्यांच्या उपस्थितीला दोष देतोय. तर कुणी आणखी कशाला दोष देतोय. पण ही सगळी कारणं निरर्थक आहेत. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर निर्णायक लढतीत आपण अपेक्षित खेळ करू शकलो नाही. अंतिम सामन्याचा दबाव व्यवस्थित हाताळू शकलो नाही आणि लढवय्या ऑस्ट्रेलियन संघाला रोखण्यासाठी योग्य तो प्लॅन आखू शकलो नाही, हीच आपली चूक झाली.

आता या चुका उगाळून काही फायदा होणारा नाही. त्यातून आपल्याला वर्ल्डकपही मिळणार नाही. पण आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत सातत्याने होत असलेले पराभव ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. हल्लीच्या काळात २०१४ च्या टी-२० वर्ल्डकपपासून सातत्याने आपण उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पराभूत होत आहोत. यामध्ये १०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल, २०१५ आणि २०१९ च्या वर्ल्डकपचे आणि २०१६ आणि २०२२ च्या टी-२० वर्ल्डकपचे उपांत्य सामने, गेल्या दोन वर्षांत झालेले आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दोन अंतिम सामने आणि आता विश्वचषकाचा अंतिम सामना असे अनेक मोठे सामने स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर गमावले आहेत. आपल्या संघात एवढे दिग्गज खेळाडू असतानाही संघावर कुठला अतिरिक्त दबाव येतोय का, अंतिम सामन्याचं दडपण झुगारण्यात आपला संघ का कमी पडतोय, याचा शोध घेतला गेला पाहिजे. आपला संघ चांगला होता, चांगले खेळलो, असं म्हणून मनाचं समाधान होईल. पण आपण ज्या विजेतेपदासाठी खेळतो, तेच मिळालं नाही तर त्या चांगल्या खेळाचा काय उपयोग? त्यामुळे आता भारतीय संघ, संघव्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून यावर काहीतरी मंत्रणा, विचारमंथन होईल, एवढीच अपेक्षा.    

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय