Join us  

Ind Vs Aus Final: २० वर्षांची प्रतीक्षा, आज वचपा निघणार, ते घाव भरले जाणार? 

ICC CWC 2023, Ind Vs Aus: इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका अशा प्रतिस्पर्ध्यांना गारद करत गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गाठली होती. आता शेवटचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया. २० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार. धूर्त कांगारूंची शिकार करत आपण वर्ल्डकप जिंकणार, असंच वातावरण सगळीकडे होतं. पण...

By बाळकृष्ण परब | Published: November 19, 2023 9:56 AM

Open in App

- बाळकृष्ण परबतारीख २३ मार्च २००३, ठिकाण जोहान्सबर्गमधील वाँडरर्स स्टेडियम, आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने सामने आले होते. तेव्हा जागतिक क्रिकेटवर आपली एकतर्फी हुकूमत गाजवत असलेला रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेत एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचला होता. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गटसाखळीतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाचा धक्का पचवून पुढे एकही सामना न गमावता फायनलमध्ये मुसंडी मारली होती. मास्टर ब्लास्टर सचिन त्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याला कॅप्टन दादा गांगुली, राहुल द्रविड यांच्याकडून उत्तम साथ मिळत होती. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ हे तेव्हाचं तरुण रक्तही जोशात खेळत होतं. अनुभवी जवागल श्रीनाथसह झहीर खान आणि आशिष नेहरा यांचा वेगवान मारा आफ्रिकेलीत जलद गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यावर फलंदाजांची दाणादाण उडवत होता. इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका अशा प्रतिस्पर्ध्यांना गारद करत गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गाठली होती. आता शेवटचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया. २० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार. धूर्त कांगारूंची शिकार करत आपण वर्ल्डकप जिंकणार, असंच वातावरण सगळीकडे होतं. होमहवन, नवससायास सुरू होते. शुभेच्छा दिल्या जात होत्या. रंगपंचमीचा दिवस होता तो, आता विजयाचे रंग आपणच उधळणार, असं मनोमन वाटत होतं. पण अखेरच्या क्षणी घात झाला. अगदी सत्यात उतरणारं स्वप्न अचानक भंगलं. तेव्हाच्या १०२ कोटी भारतीयांची मनं हळहळली. आमच्यासारख्या ९०च्या दशकात जन्मलेल्या आणि नुकतंच क्रिकेट समजू लागलेल्यांच्या दु:खाला तर पारावारच उरला नव्हता. संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय संघाचं नेमकं काय चुकलं. हे अजूनही कळालेलं नाही. 

९० च्या दशकात जन्मून २१ व्या शतकाच्या सुरुवातीला लहानाचे मोठे झालेल्या कुणालाही तुम्ही त्यांनी पाहिलेला सर्वोत्तम क्रिकेट वर्ल्डकप आणि भारतीय संघाबाबत विचारलं तर ते २००३ च्या वर्ल्डकपच्या आठवणी सांगतील. त्याचं कारण म्हणजे त्या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाची कामगिरीच तशी होती. त्यावेळी नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन सामने वगळता आपण सर्व सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ अजेय असल्यासारखा खेळत असला, प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकत असला तरी त्यांना आपण हरवू असं मनोमन वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी कोलकात्यातील ईडन गार्डनवर ऐतिहासिक कसोटीत कांगारूंचा पराभव केल्याचा अनुभवही आपल्या गाठीशी होताच.

पण आता वाटतं तो दिवस आपला नव्हताच. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाल्यावर नाणेफेकीचा कौल वगळता आपल्या मनासारखं काहीच झालं नाही. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला बोलावायचा अनाकलनीय निर्णय गांगुलीनं घेतला आणि भारतीय संघाची पुढची सगळीच गणितं चुकत गेली. संपूर्ण स्पर्धा गाजवणाऱ्या झहीर खानने पहिल्याच षटकात लय गमावली. गिलख्रिस्ट आणि हेडनने बघता बघता सव्वाशे धावा कुटून काढल्या. तेव्हा हरभजन सिंगने या दोघांना बाद करत आशेची ज्योत पेटवली. पण नंतर आलेल्या रिकी पाँटिंगच्या वादळात तीही विझून गेली. त्या दिवशी आपल्या गोलंदाजंविरोधात पाँटिंगची बॅट अशी काही चालली की त्या बॅटमध्ये स्पिंग होती, यावर तेव्हा अनेकांचा बसलेला विश्वास यत्किंचितही कमी झालेला नाही. बाकी पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने उभ्या केलेल्या ३५९ धावा म्हणजे सर न करता एव्हरेस्ट शिखर होते. पण काही तरी चमत्कार होईल अशी वेडी आशा होती. पण ही आशा पहिल्याच षटकात फोल ठरली. ज्यांच्या खांद्यावर विश्वविजय साकारण्याचा भार होता, तो सचिन मॅकग्राच्या गोलंदाजीवर धारातीर्थी पडला अन् सामन्याचा निकाल निश्चित झाला. पुढे सेहवागने प्रतिकार केला, पण तोही अपुरा पडला. अखेरीस सव्वाशे धावांनी दारुण पराभवाचं दान पदरात पडलं आणि विश्वविजेतेपदाचं स्वप्नही भंगलं. आपल्या संघातील सचिन, गांगुली, द्रवीड यांचे ते रडवेले चेहरे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्याला खिजवत केलेलं सेलिब्रेशन आजही डोळ्यांसमोर आलं की मनाला हुरहूर लागते.

आज या घटनेला २० वर्षं होऊन गेली. दोन दशकं लोटली. क्रिकेट बदललं. दरम्यान, दोन्ही संघांमधील अनेक खेळाडूंच्या कारकिर्दी बहरास येऊन अस्तासही गेल्या. या काळात भारतीय संघानं संधी मिळेल तिथे ऑस्ट्रेलियन संघाला बदडून काढलं. घरच्या मैदानाबरोबरच ऑस्ट्रेलियातही विजय मिळवले. पण २००३ च्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवामुळे तेव्हा बालमनावर झालेली जखम मात्र काही भरून निघाली नाही. नाही म्हणायला नंतर आपण २०११, २०१९ आणि यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं. पण या सामन्यांची तुलना त्या फायनलशी होऊ शकत नाही. तेव्हा कुठलाही सोशल मीडिया नसताना रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा जोरात पसरली होती. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची फायनल पुन्हा खेळवणार असले दावेही केले जायचे, आमचं वेडं मन तेव्हा त्यावर विश्वासही ठेवायचं. पण तशी मॅच काही खेळवली गेली नाही. मात्र आता नियतीनेच ती संधी भारतीय संघाला मिळवून दिलीय, असंच दिसतंय. त्यामुळेच आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून २० वर्षांपूर्वीच्या त्या पराभवाचा वचपा काढावा आणि अनेक वर्षं मनाच्या कोपऱ्यात अनेक वर्षांपासून भळभळत असलेल्या जखमेवर विजेतेपदाची फुंकर घालावी हीच अपेक्षा!

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा