Join us  

बांगलादेशच्या ' राडेबाज ' क्रिकेटपटूंवर आयसीसीची कारवाई

आनंद साजरा करत असताना त्यांनी पेव्हेलियनचे काचेचे दार तोडले. त्यामुळे यावरही आयसीसी कारवाई करणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. आयसीसीने याबाबत बांगलादेशच्या संघ व्यवस्थापना प्रश्न विचारला होता. पण बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनाने मात्र या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 6:50 PM

Open in App
ठळक मुद्देही कारवाई करताना आयसीसी पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली, त्याचबरोबर बांगलादेशच्या खेळाडूंची चौकशीही केली.

कोलंबो : श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी जो राडा केला, त्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. ही कारवाई करताना आयसीसी पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली, त्याचबरोबर बांगलादेशच्या खेळाडूंची चौकशीही केली.

सामन्याच्या शेवटच्या षटकात जे नाट्य घडलं ते काही चाह्त्यांच्या पचनी पडलेले नाही. अखेरच्या षटकाच्या  दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. हा चेंडू षटकातील दुसरा बाउन्सर असतानाही पंचांनी नो-बॉल का दिला नाही, असा आक्षेप घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं हुज्जत घातली. त्यानं आपल्या फलंदाजांना सामना सोडून माघारी यायला सांगितलं. त्यामुळे पाच मिनिटं खेळ थांबला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा वाद मिटवला. त्याचवेळी, बांगलादेशचे फलंदाज मैदानावर गेले नाहीत, तर संघ अपात्र ठरेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत जाईल, याची जाणीव बांगलादेशचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी यांनी करून दिली. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला आणि बांगलादेशने थरारक विजय मिळवला होता.

आयसीसीने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शकिब अल हसनवर कारवाई केली आहे. आयसीसीने त्याच्या सामन्याच्या मानधनापैकी 25 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापणार आहे. त्याचबरोबर मैदानात ड्रींक्स घेऊन गेलेल्या नुरुल हसनवरही आयसीसीने कारवाई केली आहे. खेळपट्टीवर जाऊन भांडण केल्याचा आरोप आयसीसीने नुरुलवर लावला आहे. त्यामुळे आयसीसीने त्याला एक डिमेरीट पॉईंट दिला आहे.

सामना जिंकल्यावर बांगलादेशच्या खेळाडूंनी पेव्हेलियनमध्ये हैदोस घातला होता. आनंद साजरा करत असताना त्यांनी पेव्हेलियनचे काचेचे दार तोडले. त्यामुळे यावरही आयसीसी कारवाई करणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. आयसीसीने याबाबत बांगलादेशच्या संघ व्यवस्थापना प्रश्न विचारला होता. पण बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनाने मात्र या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सर्व नुकसान भरपाई बांगलादेश क्रिकेट मंडळ भरणार आहे.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८