Join us  

मेलबर्नवर मैदानावर उतरण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचं 'ते' शतक वारंवार पाहिलं - अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले. 

By स्वदेश घाणेकर | Published: January 24, 2021 5:37 PM

Open in App

अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे ठेवली. अॅडलेड कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया इतकं सॉलीड कमबॅक करेल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्काच्या पहिल्या बाळंतपणासाठी रजेवर गेला. त्यानंतर खचलेल्या खेळाडूंना सोबत घेऊन टीम इंडियाचा मालिका पराभव टाळण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आली. पण, तो त्यानं खचला नाही, तर सहकाऱ्यांसह ऑस्ट्रेलियाचा सामना केला. मेलबर्न कसोटीत शतक झळकावून त्यानं सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवला आणि त्यानंतर मालिकेत काय झालं हे सर्वांनी अनुभवलं. अजिंक्यनं ते शतक झळकावण्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याची १९९९मधील खेळी अनेकदा पाहिली. 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्यनं याबाबतचा खुलासा केला.

विराट कोहली मायदेशी परतला, मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादव जायबंदी झाला. तरीही अजिंक्य खचला नाही आणि त्यानं शतकी खेळीसह कल्पक नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले. पहिल्या डावात ११२ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा 'Mullagh Medal' नं सन्मान करण्यात आला आणि हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मेलबर्नवर शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्यनं पुन्हा एकदा त्याचे नाव MCGच्या मानाच्या फलकावर झळकावले.

अजिंक्यनं सांगितले की,''मेलबर्नवर फलंदाजीला उतरण्यापूर्वी मी सचिन तेंडुलकर यांनी १९९९मध्ये मेलबर्नवर झळकावलेल्या शतकाचा व्हिडीओ अनेक वेळा पाहिला. त्याचा मला फायदा झाला.'' सचिननं १९९९च्या कसोटीत मेलबर्नवर १९१ चेंडूंत ९ चौकार १ षटकार खेचून ११६ धावांची खेळी केली होती. पण, सचिनची ही खेळी व्यर्थ ठरली होती आणि ऑस्ट्रेलियानं १८० धावांनी तो सामना जिंकला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणे