Join us  

लोक काय म्हणतात, याची मी पर्वा करत नाही - विराट कोहली

निराशाजनक कामगिरीमुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 3:25 PM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने याही मोसमात अपयश पाढा गिरवला. त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आलेच, शिवाय गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले. या निराशाजनक कामगिरीमुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर कोहलीवर टीका होत आहे.

त्या टीकेला सडेतोड उत्तर देताना कोहली म्हणाला,''पुढे काय करायचे आहे, याचा विचार करत बसणाऱ्या व्यक्तींमधला मी नाही. त्या त्यावेळी जे माझ्याकडून होणे किंवा जे अपेक्षित आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय काय म्हणतात, याचा विचार मी करत नाही. मी असाच आहे. काहींना माझं हे वागणं आवडेल, काहींना आवडणार नाही. मी सर्वांना आनंदी ठेऊ शकत नाही. जगात सर्वच माझ्या विरोधात नक्कीच नसतील. त्यामुळे हा आयुष्याचा एक भाग आहे.''

फिक्कर नॉट, धोनी असताना चिंता कशाला?; 'कॅप्टन कूल'च्या टीकाकारांना विराटचे खडे बोल इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीची संघातील उपस्थिती किती मह्त्त्वाची आहे, हे सर्वांना माहीत आहे. फलंदाज किंवा यष्टिरक्षक म्हणूनच नव्हे, तर त्याच्यातील नेतृत्वगुणाचा संघाला फायदा होणार आहे. त्याच्या अनुभवाची कर्णधार विराट कोहलीला अधिक मदत मिळणार आहे. त्यामुळेच कोहली निर्धास्त आहे. धोनी संघात आहे, तर चिंता कशाला, असे मत त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. 

तो म्हणाला,''धोनीबाबत मी काय सांगू ? त्याच्या मार्गदर्शनाखाली माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मागील अनेक वर्षांत त्याला जवळून जाणून घेणाऱ्या अनेक खेळाडूंमध्ये मीही आहे. धोनीसाठी संघाच हित हे महत्त्वाचे आहे आणि बाकी सर्व दुय्यम. त्याची ही गोष्ट प्रभावित करणारी आहे. तो नेहमी संघाचा विचार करतो. त्याच्याकडे असलेल्या अनुभवामुळे अन्य संघांच्या तुलनेत भारतीय संघ कुठे उभा आहे हे पाहा? त्याच्यामुळे भारतीय संघ अन्य संघांच्या तुलनेत वरचढ ठरतो. यष्टिमागील त्याच्या कामगिरीने अनेकदा सामन्याचे चित्रच बदलले आहे.'' 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर्ल्ड कप २०१९