Join us

माझी कोणाशीही स्पर्धा नाही : विराट कोहली

विराट कोहलीने भलेही क्रिकेटविश्वाचा आपण सम्राट असल्याचे सिद्ध केले असले तरी आपली कोणाशीही स्पर्धा नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:10 IST

Open in App

सेंच्युरियन : विराट कोहलीने भलेही क्रिकेटविश्वाचा आपण सम्राट असल्याचे सिद्ध केले असले तरी आपली कोणाशीही स्पर्धा नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.कोहलीने नुकत्याच झालेल्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३ शतकांच्या साहाय्याने ५५८ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने द. आफ्रिकेचा ५-१ असा पराभव केला. मात्र, मी कधीही प्रसिद्धीसाठी क्रिकेट खेळत नाही, असे त्याने सांगितले आहे.स्वत:ला सर्वोत्कृष्ट फलंदाज समजतोस का, असे विचारले असता तो म्हणाला, ‘माझी कोणाशीही स्पर्धा नाही. मी कधीही प्रसिद्धीसाठी खेळलेलो नाही. मी केवळ माझे काम प्रामाणिकपणे करतो. माझ्याबद्दल काय लिहावे हे मी ठरवत नाही. कोणी स्तुती करावी म्हणून मी हे करत नाही,’ असे सांगून तो म्हणाला, की जोपर्यंत संघाला माझी गरज आहे तोपर्यंत मी लोक काय म्हणतील, याची काळजी करत नाही. भारतीय संघाने मालिका जिंकली असली तरी विराट कोहली स्वस्थ बसण्याच्या मूडमध्ये नाही. पुढील वर्षी होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी त्याने आताच संघातील कच्चे दुवे शोधले आहेत. तो म्हणाला, ‘आम्ही एकत्र बसून आमच्या उणिवांबद्दल चर्चा करणार आहोत. त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.’ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते, फक्त आकडे नव्हे, तर तुम्ही कशा पद्धतीने धावा करता, तुमचा संघावर पडणारा प्रभाव या सर्व गोष्टींचा विचार केल्यास विराट जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.कोहलीकडून खूप शिकण्यासारखे : मार्करामदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम विराट कोहलीच्या कामगिरीने खूपच प्रभावित झाला आहे. विराटला पाहून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असे तो म्हणतो. स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर संघाला विजयी मार्गावर नेणे, चुकांसाठी स्वत:लाच जबाबदार धरणे या गोष्टी अनुकरणीय आहेत, असे त्याला वाटते.मार्कराम म्हणाला, ‘कोहली जिंकण्यासाठी नेहमीच आतुर असतो. त्यासाठी तो आपल्या चुकीवरही नाराज होतो. तो फलंदाजी करत असतो तेव्हा तो संघाला विजयी करण्यासाठीच फक्त खेळत असतो.’ तो म्हणाला, ‘त्याच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. कोहलीमुळेच दोन्ही संघांत मोठा फरक निर्माण झाला. त्याची धावांची भूक व सामना जिंकण्यासाठी झोकून देण्याची वृत्ती याला कुठेच तोड नाही.’

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट