नवी दिल्ली : कर्णधार दिनेश चांदीमल व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक शतके झळकावित मोठी भागीदारी केली असली तरी भारताने अखेरच्या सत्रात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात सोमवारी तिस-या दिवशी श्रीलंकेची पहिल्या डावात ९ बाद ३५६ अशी अवस्था करताना सामन्यावर वर्चस्व कायम राखले.
चांदीमलने ३४१ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद १४७ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त सध्याच्या मालिकेत शतकी खेळी करणारा पहिला श्रीलंकन फलंदाज ठरलेल्या मॅथ्यूजसोबत चौथ्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी केली. संघ ३ बाद ७५ अशा अडचणीत असताना या दोघांनी डाव सावरला. या जोडीने ७९.२ षटके भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. अंधूक प्रकाशामुळे पाच षटकांपूर्वी तिसºया दिवसाचा खेळ थांबविण्यात आला त्यावेळी चांदीमलला संदाकन खाते न उघडता साथ देत होता. मॅथ्यूजने वैयक्तिक ६, ९३, ९८ व १०४ धावसंख्येवर मिळालेल्या जीवदानांचा लाभ घेत सहा तासांपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करीत २६८ चेंडूंच्या खेळीमध्ये १४ चौकार व २ षटकार लगावले. मॅथ्यूजचे तीन झेल यष्टिपाठी सुटले. दक्षिण आफ्रिका दौºयापूर्वी भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब आहे.
भारतातर्फे आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने ९० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. ईशांत शर्मा (२-९३), मोहम्मद शमी (२-७४) व रवींद्र जडेजा (२-८५) यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी परतवले.
भारताने पहिला डाव ७ बाद ५३६ धावसंख्येवर घोषित केला होता. त्यामुळे श्रीलंका संघ अद्याप १८० धावांनी पिछाडीवर असून त्यांची अखेरची जोडी मैदानात आहे.
कालच्या ३ बाद १३१ धावसंख्येवरून सोमवारी पुढे खेळताना मॅथ्यूज व चांदीमल यांनी सावध फलंदाजी केली. सकाळच्या सत्रात २६.३ षटकांच्या खेळात त्यांनी ६१ धावांची भर घातली. दुसºया सत्रातही श्रीलंकेच्या फलंदाजांनी संथ फलंदाजी केली. ३१ षटकांत ७८ धावांच्या मोबदल्यात त्यांनी मॅथ्यूजची विकेट गमावली. श्रीलंका संघाने अखेरच्या सत्रात २८ षटकांत ८६ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट दिल्या.
मॅथ्यूजने सोमवारी वैयक्तिक ५७ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात करताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पहिला चौकार लगावला. चांदीमलने जडेजाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत ५४ व्या षटकात श्रीलंकेला दीडशेचा पल्ला गाठून दिला. श्रीलंकेच्या कर्णधाराने शमीच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत १४५ चेंडूंमध्ये या मालिकेत सलग तिसºयांदा अर्धशतक पूर्ण केले. उपाहारानंतर जडेजाच्या गोलंदाजीवर भारताला विकेट मिळविण्याची संधी होती, पण डावखुºया फिरकीपटूचा कमी उसळलेला चेंडू मॅथ्यूजच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या पायाच्या मधून सीमापार गेला. मॅथ्यूज त्यावेळी ९३ धावांवर खेळत होता.
भारताने ८१ व्या षटकानंतर दुसरा नवा चेंडू घेतला. विराटने गोलंदाजीसाठी ईशांतला पाचारण केले. ईशांतच्या पहिल्याच चेंडूवर मॅथ्यूजच्या बॅटला लागून उडालेला झेल दुसºया स्लिपमध्ये तैनात रोहितला टिपता आला नाही. त्यावेळी मॅथ्यूज ९८ धावांवर होता. रविवारी कोहलीने ईशांतच्या गोलंदाजीवर मॅथ्यूजला जीवदान दिले होते. मॅथ्यूजने ईशांतच्या याच षटकात दोन धावा वसूल करीत २३१ चेंडूंमध्ये आठवे कसोटी शतक पूर्ण केले. मॅथ्यूजने यापूर्वी दोन वर्षांआधी कसोटी शतक ठोकले होते. आॅगस्ट २०१५ मध्ये भारताविरुद्ध गॉलमध्ये त्याने ही शतकी खेळी केली होती. त्यानंतर ३६ डावांमध्ये त्याला शतक ठोकता आले नाही.
मॅथ्यूज वैयक्तिक १०४ धावसंख्येवर चौथ्यांदा सुदैवी ठरला. त्यावेळी बदली खेळाडू विजय शंकरला जडेजाच्या गोलंदाजीवर मिड आॅफवर त्याचा झेल टिपण्यात अपयश आले. चेंडू त्याच्या हाताला लागून सीमापार गेला. अश्विनने चाहापानाला १० मिनिटांचा अवधी शिल्लक असताना डावाच्या ९८ व्या षटकात मॅथ्यूजला तंबूचा मार्ग दाखवला. अश्विनच्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड घेऊन गेलेला झेल यष्टिरक्षक साहाने टिपला.
चांदीमलने चाहापानानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर एक धाव घेत २६५ चेंडूंमध्ये १० वे कसोटी शतक पूर्ण केले. चांदीमलने ८० व्या डावात दहाव्यांदा शतकी खेळी केली. श्रीलंकेसाठी हा विक्रम आहे. यापूर्वी थिलान समरवीराने ८४ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.
पहिल्या दिवशी मुरली विजयचा फटका हेल्मेटवर आदळल्यामुळे मैदानाबाहेर गेलेला सदीरा समरविक्रम सुरुवातीपासून फॉर्मात दिसला. त्याने जडेजाच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकल्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीवरही दोन चौकार वसूल केले. चांदीलमलने जडेजाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत १११ व्या षटकात संघाला ३००चा पल्ला ओलांडून दिला. समरविक्रम मात्र ईशांतच्या गोलंदाजीवर साहाकडे झेल देत माघारी परतला. समरविक्रमने ६१ चेंडूंना सामोरे जाताना ३३ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत पहिला डाव ७ बाद ५३६ (डाव घोषित).
श्रीलंका पहिला डाव :- दिमुथ करुणारत्ने झे. साहा गो. शमी ००, दिलरुवान परेरा पायचित गो. जडेजा ४२, धनंजय डिसिल्वा पायचित गो. ईशांत ०१, अँजेलो मॅथ्यूज झे. साहा गो. अश्विन १११, दिनेश चांदीमल खेळत आहे १४७, सदीरा समरविक्रम झे. साहा गो. ईशांत ३३, रोशन सिल्वा झे. धवन गो. अश्विन ००, निरोशन डिकवेला त्रि. गो. अश्विन ००, सुरंगा लकमल झे. साहा गो. शमी ०५, लाहिरू गमागे पायचित गो. जडेजा ०१, लक्षण संदाकन खेळत आहे ००. अवांतर (१६). एकूण १३० षटकांत ९ बाद ३५६. बाद क्रम : १-०, २-१४, ३-७५, ४-२५६, ५-३१७, ६-३१८, ७-३२२, ८-३३१, ९-३४३. गोलंदाजी : शमी २४-६-७४-२, ईशांत २७-६-९३-२, जडेजा ४४-१३-८५-२, अश्विन ३८-८-९०-३.
रविवारी प्रदूषणाच्या मुद्यावर चर्चेत असलेल्या कोटलावर सोमवारी सकाळच्या सत्रात परिस्थिती विशेष चांगली नव्हती. श्रीलंकेच्या खेळाडूंवरही त्याचा प्रभाव जाणवला. खेळ सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनंतर चांदीमलने श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे जवळजवळ तीन मिनिट खेळ थांबविण्यात आला. मैदानाजवळ असलेल्या आयटीओच्या वायू गुणवत्ता मापकामध्ये (एक्यूआय) ११ वाजेपर्यंत एक्यूआयने ४०० चा आकडा ओलांडला होता. प्रकृतीचा विचार करता हा आकडा धोकादायक आहे. रविवारी दोनदा खेळ थांबविण्यात आला त्यावेळी एक्यूआय २०० पेक्षा थोडा अधिक होता. दुपारी एक वाजतानंतर एक्यूआय १९२ वर आला होता.