Join us  

रवी शास्त्रींना किती मिळतो पगार; आता झाली घसघशीत वाढ

शास्त्री यांच्याबरोबर सहाय्यक प्रशिक्षकांचे पगारही वाढले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 3:38 PM

Open in App

मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा या पदावर दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर शास्त्री यांचा पगार चक्क 20 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पण शास्त्री यांना किती पगार होता आणि आता सध्या किती झालाय, हे तुम्हाला माहिती आहे का...

मुंबई मिरर या वर्तमानपत्राने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शास्त्री यांना नेमका पगार आहे, हे समजले आहे. शास्त्री यांना यापूर्वी वार्षिक आठ कोटी रुपये, एवढा पगार होता. पण आता त्यांना 20 टक्के अप्रायझल देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचा पगार आता जवळपार दहा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

शास्त्री यांच्याबरोबर सहाय्यक प्रशिक्षकांचे पगारही वाढले आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचे आता वार्षिक पॅकेज 3.5 कोटी रुपये झाले आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनाही अरुण यांच्या एवढेच पॅकेज देण्यात आले आहे. संजय बांगर यांच्याऐवजी आता विक्रम राठोड यांना फलंदाजी प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. त्यांना आता वर्षाला जवळपास 3 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.

फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी संजय बांगर, विक्रम राठोड आणि मार्क रामप्रकाश यांच्यांमध्ये स्पर्धा होती. गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी भारत अरुण, पारस म्हाब्रे आणि वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, अभय शर्मा आणि टी. दिलीप यांच्यांमधून निवडण्यात येणार होते. पण संजय बांगर यांचा अपवाद वगळता अन्य प्रशिक्षकांना कायम ठेवण्यात आले आहे.

विक्रम राठोड यांनी राठोड यांनी 1996 साली इंग्लंडमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. भारतीय संघाकडून त्यांनी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. राठोड हे 2012 साली भारताच्या निवड समितीचे सदस्य होते. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडने राठोड यांना भारताच्या 'अ' संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनवायला हवे, असे मत व्यक्त केले होते.

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआय