मुंबई : देशातील सर्वांत प्रतिष्ठेची आणि जुनी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी चषक स्पर्धेत बलाढ्य मुंबई संघ गुरुवारी आपला ५००वा ऐतिहासिक सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ४१ वेळा जेतेपद जिंकणारा मुंबई संघ ५०० रणजी सामना खेळणारा पहिला संघ ठरणार आहे.
गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई बडोद्याविरुद्ध दोन हात करण्यास उतरेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला बीकेसी येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केलेल्या सर्व कर्णधारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुंबई क्रिकेटपटूंना कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या वृत्तीमुळे त्यांना ‘खडूस’ म्हणून ओळखले जाते आणि याच खडूसपणाच्या जोरावर अनेक हाताबाहेर गेलेले सामने मुंबईकरांनी आश्चर्यकारकपणे जिंकले आहेत.
मुंबई क्रिकेटच्या योगदानाबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘मुंबई रणजी संघाने सर्वाधिक शानदार खेळाडू दिले आहेत. रणजी स्पर्धेच्या निमित्ताने देशातील काही सर्वोत्तम खेळाडूंच्या सोबत आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आमच्या खेळाडूंनी खूपकाही शिकले आहे. प्रत्येक मुंबईकर खेळाडूला मुंबई संघाची कॅप परिधान करताना गर्व वाटतो. याला सोपी गोष्ट न मानने आणि भूतकाळातील यशावर समाधानी न राहणे, यामुळेच मुंबई रणजी संघाने अनेक वर्षे दबदबा निर्माण केला आहे.’