बर्मिंघम : कौंटी क्रिकेटमध्ये खेळून गोलंदाजी शैली बदलण्यास मदत झाल्याचे मत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या डावात चार गडी बाद करणारा आश्विन कौंटीत वॉरेस्टरशायरसाठी खेळतो.
बीसीसीआय टीव्हीशी बोलताना तो म्हणाला, ‘मी मागच्या वर्षी पहिल्यांदा कौंटी खेळण्यासाठी आलो तेव्हा गोलंदाज येथे किती वेगाने चेंडू टाकतात हे जाणून घेतले. येथे खेळपट्टी पहिल्याच दिवशी मंद असते. त्यावर उसळी घेणारा चेंडू टाकला तरी वेग नसेल तर फलंदाजाला चेंडू फ्रंट आणि बॅकफूटवर टोलविणे सोपे जाते. मी याविषयी जाणून घेतले. तेव्हापासून गोलंदाजी शैलीवर काम करण्याचा निर्णय घेतला.’ ३१ वर्षांच्या आश्विनने ५८ कसोटींत ३१६ गडी बाद केले आहेत.
गेल्या दीड वर्षांत आश्विन अधिक क्लब क्रिकेट खेळला आहे. शैली आणखी सोपी करण्याचा त्याचा प्रयत्न होता, त्यात तो यशस्वीही ठरला. तो पुढे म्हणाला, ‘चेंडू हवेत ठेवून गोलंदाजांना चकविण्यावर मी भर दिला. यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. खेळपट्टीची पत पाहून आम्ही बळी घेण्याचा विचार डोक्यात आणतो तर फलंदाज विकेटवर धावा काढण्याचा आनंद घेण्याच्या विचारात असतात. मी हवेत चेंडू फिरवित ठेवण्यावर भर देतो.’ (वृत्तसंस्था)