Join us  

रवी शास्त्रींच्या करारात वाढ; २०२० पर्यंत भारतीय संघाची जबाबदारी? 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि प्रशासकीय समितीचे प्रमुख राहुल जोहरी यांच्यात आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:01 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि प्रशासकीय समितीचे प्रमुख राहुल जोहरी यांच्यात आज बैठक होणार आहे. या बैठकीत भारतीय संघाच्या साहाय्यक खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या कराराचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. मुंबईत ही बैठक होणार आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन शशांक मनोहरही बीसीसीआयच्या काही प्रमुख सदस्यांशी कर सवलतीच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. 

मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहलीसोबत साहाय्यक खेळाडू व प्रशिक्षकांच्या कराराच्या मुद्यावर गहन चर्चा करणार आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांचा करार येत्या जुलै महिन्यात संपणार आहे. पण त्यात २०२० पर्यंत वाढ व्हावी असा प्रशासकीय समितीचा आग्रह आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने प्रशासकीय समितीला प्रभावित केले आहे. त्यामुळेच शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखालील साहाय्यक टीमलाच पुन्हा ही जबाबदारी द्यावी असा त्यांचा आग्रह आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वन डे व कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर न्यूझीलंडला त्यांच्याच घरी नमवले. भारतीय संघाने २०१८ चा आशिया कपही जिंकला आणि वेस्ट इंडीजला वन डे, कसोटी व ट्वेंटी-२० मालिकेत लोळवले. 

त्यामुळे आजच्या बैठकीत करार वाढीवर शिक्कामोर्तब होईल. त्यानुसार शास्त्री आणि त्यांच्या साहायक्कांना २०२० च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ मिळेल. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या संदर्भात शास्रींनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याशी चर्चा केली आहे. त्याशिवाय आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या मागण्यांवरही चर्चा केली जाणार आहे. 

इंडियन प्रीमिअर लीगचे संपूर्ण वेळापत्रकही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने केवळ पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २३ मार्चपासून स्पर्धा सुरू होईल. 

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआयविराट कोहली