Join us  

हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना हेड आणि अभिषेक यांनी आपल्या लौकिकानुसार चौफेर फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 5:28 AM

Open in App

हैदराबाद : १६६ धावांचे मिळालेले आव्हान केवळ ९.४ षटकांमध्ये पार करत हैदराबादने लखनौचा १० गड्यांनी फडशा पाडला. या जबरदस्त विजयासह हैदराबादने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावताना प्ले ऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. ट्रॅविस हेडने १६ चेंडूंत, तर अभिषेक शर्माने १९ चेंडूंत अर्धशतक झळकावत लखनौला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. यासह हैदराबादने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच लखनौला नमवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना हेड आणि अभिषेक यांनी आपल्या लौकिकानुसार चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी केवळ ५८ चेंडूंत नाबाद १६७ धावा करत हैदराबादला दणदणीत विजय मिळवून दिला. या दोघांना रोखण्यात लखनौच्या कोणत्याच गोलंदाजाला यश आले नाही. केवळ ३४ चेंडूंत संघाचे शतक झळकावत हेड-अभिषेक यांनी सामन्याचे चित्र स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादने दुसऱ्यांदा शतक झळकावले, तसेच हेडने दुसऱ्यांदा १६ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला. 

त्याआधी, प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर आयुष बदोनीने झळकावलेल्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर लखनौने समाधानकारक मजल मारली. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सुरुवातीलाच लखनौला दोन हादरे दिले. मात्र, बदोनीने निकोलस पुरनसह संघाला सावरले. भुवनेश्वरने तिसऱ्या व पाचव्या षटकात अनुक्रमे क्विंटन डीकॉक आणि मार्कस स्टोइनिस यांना स्वस्तात बाद केले. यानंतर लोकेश राहुल व कृणाल पांड्या हेही बाद झाल्याने १२ व्या षटकात लखनौची ४ बाद ६६ धावा अशी अवस्था झाली. बदोनीने निकोलस पुरनसह पाचव्या गड्यासाठी ५२ चेंडूंत नाबाद ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यांनी ६३ धावा कुटल्या.

 यंदाच्या आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १० बळी घेतले.

 यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत कमी १३ हजार ७९ चेंडूंत एक हजार षटकारांचा टप्पा पार झाला. गेल्या वर्षीचा (१५ हजार ३९० चेंडू) विक्रम मोडला गेला.

 हैदराबादने तिसऱ्यांदा दहा गड्यांनी बाजी मारली. बंगळुरूने सर्वाधिक चार वेळा असा विजय मिळवला आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४