Join us  

बाऊन्सर टाकू नकोस, नाहीतर मी मरून जाईन; शोएब अख्तरला आव्हानात्मक वाटणाऱ्या फलंदाजानं केलेली विनंती

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याच्या वेगवान चेंडूंचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड जायचे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 3:19 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याच्या वेगवान चेंडूंचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड जायचे. त्याच्या वेगवान माऱ्यानं फलंदाजांमध्ये एकप्रकारे भीतीच निर्माण केली होती. शोएबच्या नावावर सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम आहे. २००३साली इंग्लंडविरुद्ध त्यानं १६१.३ किलोमीटर प्रतीतास वेगानं चेंडू फेकला होता. फलंदाजांवर दहशत निर्माण करणाऱ्या शोएब अख्तरनं त्याला सतावणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगितले. हा फलंदाज सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, ब्रायन लारा,स राहुल द्रविड नाही तर मुथय्या मुरलीधरन आहे.  

मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक

अख्तरनं मुरलीधरनचं घेतलेलं नाव सर्वांना आश्चर्यात टाकणार आहे. फलंदाज म्हणून मुरलीधरननं मोठं यश मिळवलेलं नाही. पण, अख्तरला तोच आव्हानात्मक फलंदाज वाटतो. अख्तरनं स्पोर्ट्सकीडा वेबसाईटशी बोलताना सांगितले की,''मी आतापर्यंत जेवढ्या फलंदाजांना गोलंदाजी केली, त्यात मुरलीधरन हा सर्वात आव्हानात्मक फलंदाज आहे. मी मस्करी नाही करत. त्यानं मला आव्हान केलं होतं की, मला वेगात चेंडू टाकू नको आणि मी टाकलेला बाऊन्सर लागला की मी मरेन. त्यामुळे त्यानं मला पुढे चेंडू टाकण्याची विनंती केली आणि त्यावर विकेट फेकेन असेही सांगितले. पण, जेव्हा मी त्याला पुढे चेंडू टाकायचो, तेव्हा तो जोरात फटका मारायचा अन् मला सांगायचा चुकून फटका लागला.''

श्रीलंकेचा फिरकीपटून मुरलीधरनच्या नावावर कसोटीत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आहे. त्यानं १३३ कसोटींत ८०० विकेट्स घेतल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्यानं ३५० सामन्यांत ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. १२ ट्वेंटी-२० सामन्यांत १३ बळी त्याच्या नावावर आहेत. त्यानं कसोटी व वन डेत अनुक्रमे १२६१ व ६७४ धावा केल्या आहेत. शोएब अख्तरच्या नावावर ४४४ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. 

टॅग्स :शोएब अख्तरश्रीलंका