Join us  

हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्या आयुष्यात बऱ्याच वाईट घडामोडी घडताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 2:49 PM

Open in App

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्या आयुष्यात बऱ्याच वाईट घडामोडी घडताना दिसत आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या पर्वात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर सोपवले गेले, परंतु त्याच्या वाट्याला अपयश आले. त्यात त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आल्याचे पाहायला मिळतेय.. पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिच्यासोबत त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

२०२४ हे वर्ष हार्दिक पांड्यासाठी व्यावसायिक व वैयक्तिक आय़ुष्यात संघर्ष घेऊन आलेले दिसतेय. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो आयपीएलमध्ये परतला, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाला १०व्या स्थानासह स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्याला कर्णधार बनवल्याने संघातच वाद सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्यात चुलत भावाने हार्दिक पांड्याला आर्थिक गंडा घातला. 

आता व्हायरल Reddit पोस्टने त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिचपासून संभाव्य विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या आहेत. हार्दिक व नताशा यांनी २०२० मध्ये लग्न केले आणि त्या वर्षाच्या उत्तरार्धात त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. २०२३ मध्ये एका भव्य समारंभात त्यांनी मोठ्या थाटात पुन्हा लग्न केलं. मात्र, त्यांच्या सोशल मीडियावरील घडामोडींमुळे भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर पूर्वी एकमेकांवर भरभरून प्रेम व्यक्त करणाऱ्या या दोघांनी एकमेकांबद्दल पोस्ट करणे बंद केले आहे. शिवाय, नताशाने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून “पांड्या” आडनाव काढून टाकले आणि हार्दिकसोबतचे बहुतेक फोटो तिच्या अकाऊंटवरून हटवले आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हार्दिक पांड्याने ४ मार्च रोजी पत्नी नताशा स्टँकोव्हिचला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत.  Reddit पोस्ट म्हणते की, “हे फक्त एक अनुमान आहे. पण दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर पोस्ट करत नाहीत. पूर्वी नताशाच्या इन्स्टाग्रामवर नताशा स्टँकोव्हिच पांड्या असे नाव होते. पण, आता तिने त्याचे नाव काढून टाकले आहे.”

त्यात पुढे म्हटले आहे की, “तिचा वाढदिवस ४ मार्च रोजी होता आणि त्या दिवशी हार्दिककडून कोणतीही पोस्ट आली नाही; तिने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट्स देखील काढून टाकल्या. तसेच, ती या आयपीएलमध्ये स्टँडमध्ये किंवा संघाशी संबंधित स्टोरी पोस्ट करताना दिसत नाही. कृणाल आणि पंखुरी अजूनही तिच्या पोस्टवर कमेंट करतात, पण त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी वाजले आहे.”

पण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृती माहिती नाही, या केवळ सोशल मीडियावरील चर्चा आहेत. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचऑफ द फिल्ड