Join us  

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर दोन सामन्यांची बंदी?

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या मनमोकळ्या गप्पांनंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 1:21 PM

Open in App

मुंबई : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या मनमोकळ्या गप्पांनंतर हार्दिक पांड्यालोकेश राहुल यांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू पांड्यानं जास्तच मनमोकळ्या गप्पा मारताला महिलांबद्दल अपमानजनक विधान केलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही पांड्यासह राहुलला बाजू मांडण्यासाठी 24 तासांची मुदत दिली. दरम्यान, प्रशासकीय समितीच्या सदस्या आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी यांच्यावर बंदीची मागणी केली. पांड्यानं दिलेल्या उत्तरावर समाधानी न झालेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोघांवर दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला आहे. 

 ''पांड्याने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही आणि या दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव मी ठेवतो. अंतिम निर्णय हा डायना एडुल्जीशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल. डायना या संदर्भात कायदेशीर सल्ला घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतानंतर अखेरचा निर्णय घेण्यात येईल,'' असे विनोद राय यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एडुल्जी यांनीही दोघांवर बंदीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ''क्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नातं काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत क्रिकेटपटूंनी यात योग्य तो समन्वय राखला होता आणि आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो, याची जाण त्यांना होती. अशा प्रकारचं विधान हे स्वाकारण्यासारखे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही 70च्या दशकात असे विधान केलं होतं आणि त्यासाठी त्यांना एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती,'' असे एडुल्जी यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

पांड्याने बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. बीसीसीआयच्या नोटिसीला उत्तर देत तो म्हणाला की,'' हा कार्यक्रम दिलखुलास गप्पांचा होता आणि त्या ओघात मी विधान करून गेलो. त्या विधानाचं गांभीर्य मला नंतर समजलं. माझी चूकं मला उमगली आणि मी बीसीसीआयची मनापासून माफी मागतो. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचीही मी माफी मागतो.'' 

टॅग्स :हार्दिक पांड्यालोकेश राहुलकॉफी विथ करण 6