Join us  

न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टीम इंडियात हार्दिक पांड्याचे पुनरागमन, पण...

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा रविवारी होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:46 PM

Open in App

दुखापतीतून सावरून पुर्णपणे तंदुरुस्त झालेला हार्दिक पांड्या टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याला संपूर्ण किवी दौऱ्यावर खेळवण्याचा धोका संघ व्यवस्थापक पत्करणार नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांत हार्दिक खेळण्याची शक्यता आहे. 24 जानेवारीपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 5 ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या दौऱ्यात टीम इंडिया ८ मर्यादित षटकांचे समाने खेळेल आणि त्यासाठी निवड समिती 15 एवजी 16-17 जणांचा चमू निवडणार आहे. भारत अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे आणि त्यात काही वरिष्ठ खेळाडूंचाही समावेश आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवड समिती खेळाडूंची निवड करतील. हार्दिक हा भारत अ संघासोबत न्यूझीलंडमध्येच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी त्याला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. 

''भारत अ संघासोबत असलेल्या हार्दिकच्या तंदुरुस्तीची पाहणी केली जाईल. तो पुर्णपणे तंदुरुस्त असल्यासच त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवले जाईल अन्यथा नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियासाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे,''असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

केदार जाधवच्या समावेशाबाबत साशंकता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. या मालिकेत केदारला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या नावावर फेरविचार केला जाईल. त्याच्याजागी सूर्यकुमार यादव किंवा संजू सॅमसन यांना संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार आणि संजू यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

 कसोटी संघात रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या व्यतिरिक्त कुलदीप यादवचा अतिरिक्त फिरकीपटू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. नवदीप सैनीलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. राखीव सलामीवीर म्हणून लोकेश राहुल आणि शुबमन गिल यांचा समावेश केला जाऊ शकतो.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याकेदार जाधवकुलदीप यादव