Join us  

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना मिळू शकते न्यूझीलंडमध्ये खेळायची संधी

बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 8:04 PM

Open in App

मुंबई : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना 'कॉफी विथ करण- 6' या कार्यक्रमात केलेलं विधान चांगलेच भोवले आहे. बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून त्यांना माघारी बोलावले आहे. पण हार्दिक आणि राहुल या दोघांना एक आशेचा किरण आज दिसला आहे. त्यामुळे त्यांना न्यूझीलंड दौऱ्यात खेळायची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियातील दौऱ्यानंतर भारताचा संघ न्यूझीलंडला जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी आता हार्दिक आणि राहुल यांना पाठवण्याचा विचार बीसीसीआय करू शकते.

बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एका आठवड्यानंतर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत बऱ्याच जणांना चिंता वाटत आहे. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी त्यांची बाजू घेतल्याचे निदर्शनास आले आहे. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली आहे.

खन्ना यांनी पत्रात लिहिले आहे की, " हार्दिक आणि राहुल यांनी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून माघारी बोलवण्यात आले. हार्दिक आणि राहुल या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली आहे. जोपर्यंत या दोघांच्या बाबतीत निर्णय येत नाही. तोपर्यंत त्यांना खेळण्याची संधी देण्यात यावी. त्यांना लवकरच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्यात यावी. " 

पंड्या आणि राहुल जे काही बोलले ते भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र गंभीर असल्याचे वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, " पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत. "

शनिवारी हार्दिक आणि कृणाल यांना मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहिले गेले. यावेळी हार्दिकच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आता कोहली मुंबईला येऊन कुणाची भेट घेणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6