नवी दिल्ली : रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. भारताचे हे सातवे आशिया चषक जेतेपद ठरले. तरीही आगामी वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे माजी कर्णधार सौरव गांगुलीसह अनेकांनी नाराजी प्रकट केली.
![]()
दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने तर निवड समितीला धारेवर धरत खडे बोल सुनावले. इंग्लंड दौऱ्यातही सलामीचे फलंदाज अपयशी ठरले असताना निवड समितीने रोहितकडे काणा डोळाच केला होता. मात्र आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याला विंडीज कसोटी मालिकेत संधे मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याला संधी न देता निवड समितीने मयांक अग्रवालचा समावेश करून घेतला.
रोहितने डिसेंबर २०१७ मध्ये कसोटीत पुनरागमन करताना श्रीलंकेविरुद्ध शतक आणि दोन अर्धशतक झळकावली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात साजेशी कामगिरी करता न आल्याने त्यला संघाबाहेर जावे लागले.