मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जात आहे. असा कोणताच विक्रम नाही, जो कोहलीसमोर नतमस्तक झालेला नाही. मागील दहा वर्षांत त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये राज्य गाजवले आहे. मात्र, आता विक्रमांचे शिखर रचणाऱ्या कोहलीचे क्रिकेटमधील पदार्पण हवे तसे झाले नाही. विक्रमांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. कोहली आज 30व्या वर्षात पदार्पण करत आहे. रणजी क्रिकेटपासून ते इंडियन प्रीमिअर लीगमधील त्याच्या पदार्पणाबाबतच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.
कोहलीच्या पदार्पणाची गोष्ट.. प्रथम श्रेणी क्रिकेट ( रणजी करंडक ) : कोहलीने 18 फेब्रुवारी 2006 मध्ये दिल्ली संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. तामीळनाडूविरुद्धच्या त्या सामन्यात कोहलीला 25 चेंडूंत केवळ 10 धावा बनवून माघारी परतावे लागले. त्याला यो महेशने बाद केले.
इंडियन प्रीमिअर लीगः 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने कोहलीला चमूत दाखल करून घेतले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 16 एप्रिल 2008 मध्ये कोहलीने पदार्पण केले. अशोक दिंडाने त्याला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. पहिल्या सत्रात त्याने 13 सामन्यांत 165 धावा केल्या.
ट्वेंटी-20 : 12 जून 2010 मध्ये कोहलीने झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 21 चेंडूंत नाबाद 26 धावांची खेळी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला.
वन डेः कोहलीने 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वन डे संघातून पहिला सामना खेळला. त्याला 22 चेंडूंत केवळ 12 धावा करता आल्या. भारताने श्रीलंकेचा डाव 146 धावांत गुंडाळला आणि 8 विकेट राखून विजय मिळवला.
कसोटीः कोहलीचे कसोटी संघातील पदार्पण फार चांगले झाले नाही. 20 जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने पहिला सामना खेळला. त्याने अनुक्रमे 4 व 15 धावा केल्या आणि दोन्ही डावांत त्याला फिडेल एडवर्डने बाद केले.