Join us  

चाहत्यांनी अमिताभच्या पंक्तीत स्थान दिल्याने सुखावलो - सुनील गावसकर

पाच दशकात क्रिकेटमधील विविध भूमिका बजाविणारे ‘लिटिल मास्टर’ या खेळाशी इमान राखून आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणाला  ५० वर्षे होत असताना गावसकर यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:45 AM

Open in App

नवी दिल्ली : १९७० च्या दशकात ‘बॉलिवूडचे शहेनशाह’ अमिताभ बच्चन  आणि किशोर कुमार अनेकांच्या हृदयात स्थान मिळवित होते. दुसरीकडे भारताचे स्टार क्रिकेटपटू सुनील गावसकर हेही अनेकांच्या अपेक्षा स्वत:च्या खांद्यावर घेत बलाढ्य देशांविरुद्ध आव्हान कसे द्यायचे, हे दाखवून देत होते. ६ मार्च रोजी भारतीय क्रिकेटमधील त्यांची ५० वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली.

पाच दशकात क्रिकेटमधील विविध भूमिका बजाविणारे ‘लिटिल मास्टर’ या खेळाशी इमान राखून आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणाला  ५० वर्षे होत असताना गावसकर यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘अमिताभ अद्याप ‘आयकॉन’ आहेत. दिवंगत किशोर कुमार तर सदाबहार कलावंत. त्यांना विसरता येत नाही. या दोन्ही महान दिग्गजांच्या पंक्तीत चाहते मला स्थान देत असतील, तर माझ्यासाठी सुखद ठरावे’.‘पाच दशकांआधी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कॅरेबियन वेगवान माऱ्याचा सामना करण्यासाठी मैदानावर आलात तेव्हा मनात कसे भाव आले होते,’ असा सवाल केला असता गावसकर म्हणाले, ‘खरेतर देशाची कॅप घालून स्वत:ला भाग्यवान मानत होतो. हृदयात गर्व होता. थोडा नर्व्हस होतो, कारण वेस्ट इंडिजचे नेतृत्व सर गॅरी सोबर्स यांच्याकडे होते.’ तसेच, ‘पदार्पणाच्या मालिकेत ७७४ धावा काढून काळाच्या कसोटीवर यशस्वी ठरलो होतो. आता मागे वळून पाहताना त्यावेळी ४०० धावा केल्या असत्या तरी आनंद झाला असता. माझ्या देशासाठी मी काहीतरी करू शकलो याचा सार्थ अभिमान वाटतो,’ असेही गावसकर म्हणाले.

‘चल फूट यहां से’ गावसकर यांची सडेतोड प्रतिक्रियामाजी दिग्गज खेळाडू आणि समालोचक सुनील गावसकर हे स्वत:चे रोखठोक मत मांडण्यासाठी प्रख्यात आहेत. भारत-इंग्लंड मालिकेत खेळपट्टीवर वक्तव्ये होत असताना त्यांनी हटके प्रतिक्रिया दिली. स्टार स्पोर्ट्‌सच्या शोमध्ये त्यांना खेळपट्टीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा गावसकर म्हणाले, ‘फलंदाज त्रिफळाबाद आणि पायचित होत असतील तर खेळपट्टी खराब कशी? जे बाहेरचे खेळाडू आहेत, त्यांना आम्ही महत्त्व का देतो? आमचा संघ ३६ धावात बाद झाल्यास आम्ही काही म्हटले तर त्याचा मीडिया आमच्या गोष्टींना महत्त्व देतो का? नाही, मग आम्ही त्यांना का महत्त्व द्यावे? ‘चल फूट यहां से’ असे उत्तर द्यावे लागेल.

टॅग्स :सुनील गावसकर