ठळक मुद्देभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस आहेटीम इंडियासह धोनी आणि केदार चेन्नई सुपर किंग्स संघात सोबत खेळतात
क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं म्हणत भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 39व्या वाढदिवशी भावनिक पत्र लिहिलं. केदार आणि धोनी यांची घट्ट मैत्री सर्वांनाच ज्ञात आहे. केदारने वेळोवेळी धोनीचे कौतुक केले आहे आणि त्याचे आभारही मानले आहेत. त्यामुळेच आज धोनीच्या वाढदिवसाचे निमित्त साधत केदारने त्याच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. या पत्राद्वारे केदारने त्याच्या क्रिकेट प्रवासाला उजाळा दिला. धोनीसोबतचे नाते कसे तयार झाले, कसे दृढ होत गेले याबाबतही सांगितले आहे.
"समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की मला कायम तुमची आठवण येते. लाईटहाऊस दिशा दाखवण्याचं काम करतं, दिशा दाखवताना उजेड देतं आणि लाटाही झेलतं, तुमच्यासारखंच! तुम्हीही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलल्या पण खंबीरपणे उभे राहिलात. लाईटहाऊस सारखंच!," असं म्हणत केदारने पत्राला सुरवात केली आहे .
सध्या लॉकडाऊनच्या काळात भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. धोनी मात्र याला अपवाद होता. असे असले तरी धोनीच्या वाढदिवसाची त्याच्या चाहत्यांनी आठवडाभर आधीपासूनच जय्यत तयारी सुरु केली होती. धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यातच केदारचे हे पत्र म्हणजे 'चेरी ऑन दी केक' आहे.
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.